सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र राऊत यांचा आरोप
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन योजना राबविण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील ढवर ग्रामपंचात हद्दीतील नवेदर बेली येथे या योजनेचे काम सुरु करण्यात आली आहे. लाखो रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. परंतु, स्थानिकांना विश्वासात न घेता, आपल्या मनमानी कारभाराने पाईप टाकण्याचे काम केले जात आहे. निकृष्ट दर्जाच्या काम केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र राऊत यांनी केला आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. हे काम माजी सरपंच विश्वनाथ गावंड करीत आहेत. कोणत्या नियमांचे पालन न करता काम केले जात आहे. या योजनेसाठी लागणारे पाईप आयएसआय दर्जाचे नाहीत. काही ठिकाणी जूनेच पाईप वापरले जात आहेत. त्या जागी नवीन पाईप टाकण्यात आल्याचे दाखवून शासनाची फसवणूक करीत आहेत. पाईप टाकण्यासाठी जमीनची खोदाई तीन फुटपर्यंत असणे आवश्यक असताना, फक्त 6 इंचापर्यंत खोदकाम केले जात आहे. जी घरे अनधिकृत आहेत, त्या घरांना प्राधान्याने पाणी देण्यात आले आहे. मात्र, अधिकृत घरांना पाईप लाईनचे पैसे भरावे लागत असल्याचे सांगून आर्थिक लुट सुरू आहे. नवेदर बेलीमध्ये साठवण टाकी ज्या जागेत बांधली जात आहे. तो भाग खाडीमध्ये येतो. टाकीसाठी करण्यात आलेल्या खड्ड्याची जागा योग्य नाही, हे काही ग्रामस्थांनी अनेकवेळा सांगितले आहे. तरी त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभाराने कामकाज सुरु केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र राऊत यांनी केला आहे.
या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. त्याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकार अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. अलिबाग पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांच्याकडेदखील तक्रार केली आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षपणामुळे ग्रामस्थांना भविष्यात प्रचंड त्रास होण्याची भिती आहे. या योजनेसाठी चांगले पाईप देऊन गावांतील लोकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे ही अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी या योजनेतील कामाची पाहणी करून ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भांडवलदारांना झुकते माप
ग्रामसेवक सुप्रिया नाईक यांच्याकडे अनेकदा तक्रारी करुनही त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य होत नाही. जलजीवनच्या कामांत भ्रष्टाचार असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतही त्यांचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र राऊत यांनी केला आहे.