उरण | वार्ताहर |
चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण, जांभुळपाडा गावातील रहिवाशांना करण्यात येत असलेला विद्युतपुरवठा हा मालवाहू कंटेनर ट्रेलरच्या धडकेने खंडित झाल्याची घटना गुरुवारी (दि.17) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झाली नाही. मात्र, विद्युत वाहक लोखंडी पोल कंटेनर ट्रेलरच्या धडकेने रस्त्यावर कलंडल्याने दोन गावांतील विद्युतपुरवठा हा 15 तास खंडित झाल्याने रहिवाशांना रात्र जागून काढावी लागली आहे.
चिर्ले, वेश्वी आणि दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील गव्हाण फाटा ते चिरनेर या रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यालगत शासनाच्या नियमांची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणात मालाची हाताळणी करणारे कंटेनर यार्ड उभी राहिली आहेत. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीबरोबर अपघाताची समस्या बळावली आहे. त्यातच भरधाव वेगाने जाणार्या मालवाहू कंटेनर ट्रेलरने गुरुवारी सायंकाळी ठिक पाचच्या सुमारास रस्त्यालगत असलेल्या विद्युत वाहक पोलला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात विद्युत वाहक लोखंडी पोल रस्त्यावर कलंडला. त्यामुळे जवळपास 15 तास गावठाण, जांभुळपाडा गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला.त्यामुळे दोन्ही गावातील 75 कुटुंबातील सदस्यांना रात्र जागून काढावी लागली आहे. तरी प्रशासकीय अधिकारी वर्गाने अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जि.प. माजी सदस्य डॉ. मनिष पाटील यांनी केली आहे.