जांभुळपाडाचे ‌‘आरोग्य’ सलाईनवर

धनुर्वातावरील इंजेक्शन, खोकल्याची औषधे संपली

| सुधागड-पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील रिक्त पदांमुळे तालुक्यातील नागरिकांना वेळेवर योग्य उपचार मिळताना अडचणी येत आहेत. परिणामी त्यांची गैरसोय होत आहे. त्यातच जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील धनुर्वातावरील इंजेक्शन व खोकल्याची औषधे संपली असल्याची बाब बुधवारी (दि.14) समोर आली आहे.

येथील रहिवासी इम्रान खान हे दुचाकीवरून पडल्याने त्यांना दुखापत झाली, त्यावेळी ते जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांना धनुर्वातावरील इंजेक्शन संपली असल्याने बाहेरून धनुर्वातावरील इंजेक्शन आणण्यास सांगितले. तसेच येथील खोकल्यावरील औषधे संपली असल्याने रुग्णांना बिना औषधांचे माघारी जावे लागते. सध्या सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढत असतांना रुग्णांना वेळेवर औषध उपलब्ध न होणे ही बाब गंभीर आहे. शिवाय तालुक्यातील आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर व कर्मचारी आलेल्या रुग्णांसोबत सदाचाराने बोलत नाहीत. रुग्णाला व्यवस्थित न तपासता औषधे देतात. ओपीडीची वेळ असूनही वेळ संपली आहे असे म्हणतात. अशी माहिती पालीतील सामाजिक कार्यकर्ते कपिल पाटील यांनी दिली. याबाबत लेखी तक्रार देखील केली असल्याचे कपिल पाटील म्हणाले.

पाली प्राथमिक आरोग्य केंद्रवर साधारण 43,810 इतकी लोकसंख्या अवलंबून आहे. तर जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर साधारण 28,861 इतकी लोकसंख्या अवलंबून आहे. सुधागड तालुक्यात साधारण 100 महसुली गावे असून तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. मात्र रिक्त पदे, औषधांचा तुटवडा यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या घटना घडतात. शिवाय गरोदर महिला, अपघातग्रस्तांना देखील चांगले उपचार मिळत नाहीत. गरोदर महिलांना प्रसूती साठी सुद्धा अलिबागला जावे लागते. सुधागड तालुक्यातील नागरिकांसाठी अतिशय अत्यावश्यक असणाऱ्या आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले असून, आरोग्य विभाग हे सद्यःस्थितीत सलाईनवर आहे, त्यामुळे आरोग्य विभागाच्या या उदासीनतेच्याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नाईलाजाने खाजगी रुग्णालयाचा आधार
सध्या सर्वत्र डेंग्यू, मलेरिया, टायफाईड अश्या आजारांची साथ सुधागड तालुक्यात आहे. तालुक्यातील जे नागरिक आर्थिक सक्षम आहेत ते खासगी रुग्णालयातून वेळेवर उपचार घेत आहेत. मात्र, तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेला गोरगरीब, खेड्यापड्यात दुर्गम भागात राहणारा आदिवासी बांधव हे शासनाने दिलेल्या आरोग्य सेवेवरच विसंबून राहतात. परंतु, रिक्त पदांमुळे तेथे त्यांना आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना पदरमोड करून खासगी रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागत आहे. तर कधी पैशांअभावी उपचारांवर पाणी सोडावे लागत आहे.

धनुर्वातावरील इंजेक्शनबाबत माहिती घेऊन ताबडतोब ती उपलब्ध करून घेऊ. तसेच खोकल्यावरील औषषधांचा पुरवठा जिल्ह्याकडूनच कमी होत असल्याने त्याची कमतरता भासते. परिणामी, सर्वांना उपलब्ध करून देता येत नाही.

डॉ. शशिकांत मढवी, तालुका आरोग्य अधिकारी

सरकारी रुग्णालयात महत्त्वाची इंजेक्शन व औषधे नसणे ही बाब योग्य नाही. तसेच रुग्णांसोबत डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागले पाहिजे.

इम्रान खान, जांभुळपाडा
Exit mobile version