। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला कोकणात पक्षातर्फे स्थगिती देण्यात आली होती. मात्र ही यात्रा पूर्ववत सुरू राहील असे भाजप तर्फे जाहीर करण्यात आल्याने कोकणातील वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात आक्षेवार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अर्थात राज्याच्या राजकीय इतिहासातील ही सर्वात मोठी घटना ठरली आहे. यापूर्वी अनेक नेत्यांनी अशी बेतान वक्तव्य केली असून त्यांचा विविध पातळीवर विविध कृतींद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राणेंच्या विधानांवरसुद्धा प्रतिक्रिया येत राज्यभर निषेध आंदोलने झालीच. पण राज्यात एका केंद्रीय मंत्र्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्याला अटक होण्याची, ही पहिलीच वेळ.
नारायण राणे यांना संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना महाड पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथील कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्यानंतर प्रथम श्रेणी दंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले. पोलिसांनी न्यायालयात राणे यांच्या 7 दिवसांच्या रिमांडची मागणी केली पण न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर रात्री उशिरा जामीन मंजूर केला. पोलिसांच्या या कारवाईला विरोध करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकार सरकारी यंत्रणा तथा पोलीस दलाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला असून भाजपने राणेंची विधान चुकीचे असल्याचे सांगत सध्याच्या संकटात संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे मत व्यक्त केले आहे.