। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथील शेतकरी पक्षाच्या निष्ठावंत, जेष्ठ कार्यकर्त्या जनाबाई यशवंत कडवे यांचे त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्या 80 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. उपसरपंच अभिजीत कडवे यांच्या त्या आजी होतं.
जनाबाई कडवे यांनी गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाच्या महिला कार्यकर्त्या म्हणून काम केले होते. महिला संघटक, लढाऊ कार्यकर्त्या म्हणून त्यांनी एक स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. राजकारणाबरोबरच समाजकारणात त्या सक्रिय होत्या. सोमवारी (दि.26) त्यांचे निधन झाले. मिळकतखार मधील स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. जनाबाई कडवे यांचे उत्तरकार्य गुरूवारी 7 मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती कडवे कुटुंबियांनी दिली.