बी. चेंज फाऊंडेशमार्फत पुरस्काराचे आयोजन
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागाव येथील संचालक मंडळ हायस्कूलमधील शिक्षिका जान्हवी अतूल बनकर यांना राज्यस्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. बी. चेंज फाऊंडेशन यांच्यामार्फत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. शिर्डी येथील निघोजमधील साई पालखी निवारामधील साई दरबारी हा कार्यक्रम रविवारी (दि.29) राज्य आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. जान्हवी बनकर यांना राज्यस्तरिय पुरस्कार प्राप्त झाल्याने अलिबागच्या व नागावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बी. चेंज फाऊंडेश यांच्यामार्फत राज्यस्तरिय आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांची निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने करून अहवाल सादरीकरण करण्यात आले. या पुरस्कारासाठी 1 हजार 300 शिक्षकांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी 36 जिल्ह्यातील 36 शिक्षकांची राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागांव येथील संचालक मंडळ हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका जान्हवी बनकर यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पूरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कामाला देव मानून मुलांमध्ये देव शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक बनविण्यासाठी जान्हवी बनकर या नेहमीच प्रयत्नशील असतात. कृषीवल दैनिकांत त्यांचे शंभरहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. अवांतर वाचननातून विद्यार्थी विकासा सारख्या शिक्षण संक्रमणातून प्रसिद्ध झालेले लेख, सतत दोन वर्ष विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांची निवड, दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरिय निवड, तसेच विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी कृतीयुक्त पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. शालेय तसेच सामाजिक संस्थांच्या विविध कार्यक्रमांमध्ये देखील त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. त्यामुळे शिक्षणाचा प्रकाश पसरवून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचा दिवा प्रज्वलीत करणाऱ्या जान्हवी बनकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.






