ऐतिहासिक जंजिराचे दरवाजे उघडले;आता प्रतीक्षा पर्यटकांची

। मुरुड । वार्ताहर ।
सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी 1 सप्टेंबर पासून सुरु करण्यात आला आहे. 1जून ते 31 ऑगस्ट या काळात हा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. सध्या पर्यटकांची ये-जा अगदी मंदगतीने झालेली पहावयास मिळत आहे. त्यामुळे स्थानिकांना आता पर्यटकांच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. पर्यटक आले तर त्यांचा व्यवसायही बहरणार आहे.

सध्या मुरुड तालुक्यात दिवसा ऊन तर सायंकाळी चारनंतर हवामान बदलते व रोज पाऊस पडतो. त्यामुळे पर्यटक अल्प प्रमाणात या किल्ल्यास भेट देत आहेत. परंतु किल्ला सुरु झाल्याने स्थानिक बोट मालक व आजूबाजूच्या परिसरात व्यवसाय करणार्‍यांची दुकाने सुरु झाल्याने स्थानिकांच्या स्वयंरोजगारास सुरुवात झाली आहे.

जंजिरा किल्ला हा स्थानिक राजपुरी जलवाहतूक संस्थांना एक शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत आहे. यामुळे स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍नही काही अंशी सोडवला जातो. जंजिर्‍यात जाण्यासाठी राजपुरी व खोरा बंदर येथून प्रवासी जलवाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या किल्ल्यावर पर्यटकांची संख्या कमी असल्याने खोरा बंदरातून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. राजपुरी नवीन जेट्टी येथूनच पर्यटकांची वाहतूक सुरु आहे. लवकरच दिवाळी येणार असून सुट्टीचा हंगाम सुरु होणार आहे. अशावेळी ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

Exit mobile version