जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी लवकरच खुला होणार

किल्ल्याच्या साफसफाईला सुरुवात

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला 22 एकरांवर पसरलेला असून, 40 फूट भिंतींनी वेढलेला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक ये-जा करीत असतात. हा किल्ला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात शासनाकडून किल्ल्याचे दरवाजे बंद केले जातात. यामुळे या पावसाळी तीन महिन्यांत किल्ल्याच्या आतील आजूबाजूला भिंतीवर 5 ते 6 फूट उंचीची झाडे वाढल्याने या ठिकाणी सरपटणारी जनावरे असू शकतात. यापासून पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पर्यटकांच्या सुरक्षतेच्या दुष्टीने पुरातत्व विभागाने किल्ल्याचे दरवाजे काही दिवस बंद ठेवून चहू बाजूला साफसफाईला सुरूवात करण्यात आली आहे. लवकरच किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले होणार आहे. पर्यटकांना शिडाच्या बोटीमधून प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळत असून, जास्तीत जास्त पर्यटक शिडाच्या बोटीत बसणे अधिक पसंत करीत असतात. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो आणि व्यावसायकांची आर्थिक परिस्थिती भक्कम होत असते; परंतु किल्ला बंद असल्याने पर्यटकांनी याठिकाणी पाठ फिरवल्याने स्थानिक व्यावसायिक चिंतेत आहेत.

किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांनसाठी कधी खुले होतील, यासंदर्भात सहाय्यक संवर्धक पुरातत्व विभाग अधिकारी बंजरंग येलीकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, पावसाळ्यात किल्ला बंद असतो, त्यामुळे या किल्ल्याच्या आतील व बाहेरील बाजूस पाच ते सहा फूट उंचीची झाडे वाढली आहेत. काल मी स्वतः किल्ल्यात होतो, साफसफाई करत असताना बाजूने साप निघून गेला. या ठिकाणी विंचू पण आहेत. या सरपटणाऱ्या जनावरांपासून कोणाच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये याकरिता सर्पमित्रांनाही बोलविण्यात आले आहे. साफसफाईकरिता 12 कामगार मिळालेत, अजून कामगार मिळविण्यासाठी प्रयत्न करतो; परंतु गणपती उत्सव जवळ आल्याने कामगार मिळत नाही. त्यात अधूनमधून पाऊस पडत आहे, त्यामुळे साफसफाईला उशीर होत आहे. आमच्या कार्यालयातील बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुंगरे हे स्वतः साफसफाई करत आहेत. लवकरात लवकर किल्ला सुरु करावा यासाठी प्रयत्न आम्ही करत आहोत. तरी स्थानिक बोट व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन बंजरग येलीकर यांनी केले.

Exit mobile version