जरांगेंचा फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल

महिलांच्या आडून माझ्यावर हल्ल्याचा डाव आखल्याचा आरोप

| जालना | प्रतिनिधी |

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा जरांगे यांनी महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचा माझ्यावर हल्ला करण्याचा डाव होता, असा आरोप केला आहे. सरकारने दडपशाही सुरू केली असून, तीन-चार दिवस बघू त्यानंतर निर्णय घेऊ. आठ ते नऊ तारखेपर्यंत समाजाने शांत राहावे, असे आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले आहे.

फडणवीस यांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आखला होता. हा प्रयोग संभाजीनगरमध्येच होणार होता. मात्र, महिला कार्यकर्त्यांच्या आडून एवढा खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्यांचे काम नाही, हे तुम्हाला शोभत नाही, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. माझी एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. काही लोक चौकशीला घाबरून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत असतात, मात्र चौकशीला सामोरे जाण्यासाठीच आपण हॉस्पिटलमधून बाहेर आलो असल्याचेही जरांगेंनी म्हटले आहे. फडणवीसांच्या मनामध्ये मराठा समाजाबद्दल द्वेष ठासून भरला आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच मराठा समाजाचे बॅनर, बोर्ड पोलिसांच्या माध्यमातून काढले जात आहेत. तुम्हालाही तुमचे बोर्ड लावावे लागतील ना, अशा शब्दात त्यांनी फडणवीस यांना इशारा दिला आहे.

‌‌‘माझ्या दारात यायचे नाही’ असे लिहिलेले स्टिकर तयार करण्याचे निर्देश मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील बांधवांना दिले आहेत. हे स्टिकर घर, गाड्यांवर पॉम्प्लेट तयार करून चिटकवण्याची मोहीम सुरू करा, असेदेखील त्यांनी सांगितले आहे. मराठा समाजातील नागरिकांनी गावागावात, तालुक्यात ग्रुप तयार करून आपापल्या घराला असे स्टिकर चिटकवण्याचे आवाहनदेखील त्यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील हे लोकसभा निवडणुकीला उभे राहणार अशी चर्चा सुरू आहे. जालना किंवा बीड लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राजकीय अजेंडा माझा नाही, असे म्हणत त्यांनी या शक्यता फेटाळल्या आहेत.

Exit mobile version