जरांगे पाटील आंदोलनावर ठाम

| जालना | प्रतिनिधी |

मनोज जरांगे पाटील येत्या 20 जानेवारीला अंतरवाली सराटीपासून मुंबईच्या दिशेला आंदोलनासाठी निघणार आहेत. मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये यासाठी सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण, मनोज जरांगे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत. अशा परिस्थितीत गुरुवारी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषेदेत त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसंच जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत खंबीरपणाने मला साथ द्यावी, अशी भावनिक सादसुद्धा जरांगे पाटील यांनी राज्यातील मराठा समाजाला घातली आहे.

जशी जशी वीस तारीख जवळ येत आहे, तसा तसा नव नवीन फंडा सरकार समोर आणत आहे. मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाने सरकारला सात महिन्यांचा वेळ दिला होता. सरकारच्या शिष्टमंडळाने आणि सरकारने सात महिने काय केलं, असा प्रश्न जरांगे यांनी सरकारला विचारला आहे. तसंच ज्या ज्या ठिकाणी कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरकारने आतापर्यंत का दिले नाही. राज्यभरामध्ये बऱ्याच ठिकाणी मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. तरी सरकारचे अधिकारी त्यांना कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत, फक्त वेळकाढूपणा सरकार करत आहे. मग सरकारला राज्यात अशांतता पसरवायची आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे.

Exit mobile version