आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारली
| मुंबई | प्रतिनिधी |
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं मोर्चेकरी राजधानी मुंबईच्या दिशेनं मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कूच करत आहेत. मनोज जरांगे-पाटील 26 जानेवारीपासून आझाद मैदान आंदोलन करणार आहेत. पण, आझाद मैदानात आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. लाखोंच्या संख्येनं मोर्चेकरी वाहनांसह मुंबईत येणार आहेत. त्यामुळे मुंबईत दैनंदिन जनजीनव विस्कळीत होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांना आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान, मराठ्यांच्या भगव्या वादळाची सरकारला धडकी भरली असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले. नवी मुंबईमधील खारघर येथील सेंट्रल पार्कमधील आंतरराष्ट्रीय मैदानाचा पर्याय पोलिसांनी आयोजकांना सुचवला आहे.
पुण्यातील अभूतपूर्व स्वागतानंतर लोणावळ्यात गुरुवारी (दि.25) सकाळी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पोहोचला. जरांगे यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार केला आहे. तसेच समाजाशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत लहान मुलं, तरुण, वयोवृद्ध सर्व वयोगटातील लोक जरांगेंच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरले असून बचावासाठी जागोजागी शेकोटी पेटविण्यात येत आहेत. साताऱ्यातून 25 ट्रक, 500 वाहने, कऱ्हाड 75 ट्रक, 500 गाड्या, खटावमधून 20 हजारांचे नियोजन, फलटणमधून 500 चारचाकी वाहनांनी मुंबईकडे कूच केली आहे. अशाच प्रकारे सांगली, सोलापूर, कोल्हापूरमधूनही नियोजन झाले आहे. आलेले पदयात्री रात्री वाशी येथे थांबणार असून आज चेंबूरमार्गे आझाद मैदानाकडे मार्गस्थ होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमधून शेकडो वाहनांनी लाखो मराठा बांधव पनवेल, नवी मुंबईमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समन्वयकांनी दिली.

उद्याचे नियोजन? सकाळी 26 जानेवारी निमित्त झेंडावंदन करून निघणार. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेवून मुंबईच्या दिशेने निघणार. महिला वर्ग एपीएमसीमध्ये राहणार. जेवणाची, राहण्याची सोय तसेच मोबाईल टॉयलेट आणि आंघोळीसाठी टँकर उपलब्ध.
राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील, तालुक्यातील लोक मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत. गिरणी कामगारांपासून चालत आलेल्या प्रथेनुसार प्रत्येक गावाच्या स्वतःच्या मालकीच्या मुंबईमध्ये खोल्या आहेत. गिरणी कामगारांच्या काळातील या खोल्यांमध्ये आंदोलकांचा तळ असणार आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या मराठा बांधवांची आपल्या हक्काच्या खोल्यांमध्येच व्यवस्था होणार आहे. यासाठी पनवेलपासून मुंबईपर्यंतच्या घरात जास्तीत जास्त आंदोलकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन केले गेले आहे.
मज्जा करायला मुंबईला नाही आलो- जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कुठलाही संवाद झाला नाही. आम्हाला तोडगा काढायचा आहे. मज्जा करण्यासाठी मुंबईला आलो नाही. जेवढे मुंबईचे हाल होणार आहेत, तेवढं आमचेही हाल होत आहेत. दोघांचेही हाल होऊ द्यायचे नाही, हे सरकारच्या हातात आहे, असं जरांगे-पाटील म्हणाले.
मराठा आरक्षण सरकार देणार आहे. सरकारची भूमिका कालही तीच होती, आजही तीच आहे. ओबीसी वगैरे अशा इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली आहे की सरकार पूर्ण सकारात्मक आहे. आरक्षण देण्यासाठी सरकार काम करत आहे. विविध फायदे देत आहे. फक्त आश्वासन न देता ज्या सुविधा ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला देणं आहे, त्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांना मी आवाहन केलंय की जर सरकार सकारात्मक नसेल, तर आंदोलन ठीक आहे. सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्याकडून जेवणाची सोय आरक्षण आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांसाठी नांदगाव येथे शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्याकडून पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी भगत यांनी मराठा बांधवांसोबत भाकरी आणि ठेच्याचा आस्वाद घेतला.