जासईत इंडिया आघाडीचे शक्ती प्रदर्शन

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यातील जासई, चिरनेर व दिघोडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशी या ग्रामपंचायतींच्या मतदार प्रभागात प्रचाराची रंगत आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत चाललेला आहे. याचा प्रत्यय शनिवारी जासई गावामध्ये शेकाप, काँग्रेस, शिवसेना, मनसे, बहुजन मुक्ती पार्टी इंडिया आघाडीच्या प्रचार रॅलीतून दिसून आला.

जासई ग्रामपंचायतीच्या इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जासई गावात भव्य रॅली काढण्यात आली होती. लालबावट्याबरोबर इंडिया आघाडीमधील सहभागी पक्षाचे झेंडे खांद्यावर घेऊन, आघाडीची नेतेमंडळी आणि कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. प्रचार रॅलीमधून जासई गावातून आघाडीचे झेंडे फडकवित घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. आघाडीच्या जयजयकाराच्या ललकारात ही प्रचाररॅली संपूर्ण जासई गावांमध्ये फिरली. प्रचार रॅलीत उमेदवार प्रत्येक घरात जाऊन आपल्या निवडणूक चिन्हाची ओळख करून देत होते. या प्रचार रॅलीत महिलांचा विशेष सहभाग दिसून आला. इंडिया आघाडीचे थेट सरपंच पदाचे उमेदवार संतोष घरत यांच्यासह आघाडीचे सर्व सदस्यपदांचे उमेदवार, आघाडीचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि जासई गावातील असंख्य नागरिक उत्स्फूर्तपणे या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ही भव्य प्रचार रॅली पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. इंडिया आघाडीच्या भव्य रॅलीचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. इंडिया आघाडीच्या जयजयकाराच्या घोषणा रॅलीतून होत होत्या.

प्रचार रॅलीतून जासई गावातील इंडिया आघाडीच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवारांसह सदस्यपदांच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्ते करीत होते. या सर्व उमेदवारांना प्रचारात सर्वत्र वाढता प्रतिसाद मिळत आहे. भव्य रॅलीतून विकास कामांच्या बळावर इंडिया आघाडीने जासई ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा नियोजनबद्ध प्रचार सुरू केला आहे. भविष्यात जासई गावाचा परिपूर्ण विकास व नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीचे अभिवचन देत, मतदारांचा कौल मागितला आहे. अबाल वृद्धांचे आशीर्वाद घेत, उमेदवार सर्वच नागरिकांन समोर नतमस्तक होताना दिसून आले.

Exit mobile version