खांदाडमध्ये कावीळचा धोका कायम

तीन दिवसांत 650 घरांचे सर्वेक्षण; बालकांसह महिला, प्रौढांच्या आरोग्य तपासणी

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहरातील खांदाड परिसरात कावीळच्या रुग्णांची नोंद होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वेक्षण आणि वैद्यकीय तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न केवळ काही रुग्णांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण परिसराच्या सुरक्षिततेशी जोडला गेल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

या मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी खांदाड आणि सिद्धी नगर परिसरातील 650हून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. दोन स्वतंत्र वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली असून, आशा सेविकाही घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्यविषयक माहिती संकलित करत आहेत. ताप, सर्दी, अशक्तपणा, डोळे पिवळे होणे तसेच कावीळची संभाव्य लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती घेतली जात आहे. संशयित आणि बाधित रुग्णांच्या संपर्कात राहून आवश्यक वैद्यकीय तपासणी केली जात आहे. उपचार घेत असलेल्या काही रुग्णांचे रक्ताचेनमुने पुढील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. याशिवाय काही बाधित रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याची माहितीही पुढे आली आहे. 18 नोव्हेंबर रोजी एका तरुणाने ताप आणि सर्दीच्या त्रासामुळे रुग्णालयात उपचार घेतल्याचे समजते. त्यामुळे केवळ शासकीय रुग्णालयातील नोंदींवर अवलंबून न राहता खासगी रुग्णालयांतील रुग्णांची माहितीही एकत्रित करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कावीळच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर बालकांबरोबरच महिला, तरुण, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांचीही काळजीपूर्वक तपासणी होणे गरजेचे आहे. परिसरात सध्या वास्तव्यास नसलेल्या; मात्र याच भागातील रहिवासी असलेल्या आणि अन्य ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहितीही संकलित करणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्यक्ष बाधितांची संख्या, आजाराचा संभाव्य प्रसार आणि त्यामागील कारणांचा शोध घेण्यास मदत होऊ शकते. दरम्यान, आरोग्य विभागाचे सर्वेक्षण सुरू असले तरी नागरिकांनीही ताप, उलट्या, मळमळ, अशक्तपणा, डोळे किंवा त्वचा पिवळी पडणे अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा. उकळून थंड केलेले किंवा सुरक्षित पाणी प्यावे आणि परिसरातील स्वच्छतेची काळजी घ्यावी.

स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज
कावीळच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, जलवाहिन्यांची स्थिती, सांडपाणी वाहिन्या, गटारांची स्वच्छता आणि पाणीपुरवठा व्यवस्थेची तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. पिण्याच्या पाण्यात दूषित घटक मिसळण्याची शक्यता आहे का, याची शास्त्रीय पद्धतीने तपासणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय तातडीने राबविण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Exit mobile version