। भिवंडी । वार्ताहर ।
जय बजरंग, ग्रिफिन जिम.(ब) यांनी 31व्या ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. ठाणे जिल्हा कबड्डी असो.ने उजाळा क्रीडा मंडळ-वळगांव यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. भिवंडी येथील जाईबाई काशिनाथ पाटील क्रीडानगरीत सुरू असलेल्या कुमारांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जय बजरंग संघाने शिवशंकर संघाचे कडवे आव्हान 35-33 असे परतवून लावत या गटात आगेकूच केली. मध्यांताराला निखिल भोईर, आशिष पाटोळे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर 15-10 अशी आघाडी घेणार्या जय बजरंगला उत्तरार्धात मात्र कडव्या प्रतिकाराला सामोरी जावे लागले. शिवशंकरच्या मंगेश सोनावणे, करण बनकर यांनी आपले आक्रमण अधिक धारदार करीत सामन्यात रंगत आणली.पण विजय त्यांच्यापासून दोन हात दूरच राहिला. याच विभागात ग्रिफिन जिम.(ब)ने यजमान उजाळा मंडळाला 37-25 असे पराभूत करीत उपउपांत्य फेरी गाठली. मध्यांतराला 20-14 अशी ग्रिफिन कडे आघाडी होती. मोहन पुजारा, सिद्धांत पाटील ग्रिफिनकडून, तर मिहीर पाटील, यश भोईर उजाळाकडून उत्कृष्ट खेळले.
या अगोदर झालेल्या कुमार गटाच्या बाद फेरीच्या सामन्यात विश्वरूप संघाने समर्थ मंडळाला 34-33 असे चकवीत आगेकूच केली. ओमकार व सुजल या म्हात्रे बंधूनी मध्यांतरापर्यंत आक्रमक खेळ करीत समर्थ मंडळाला 17-14 अशी आघाडी मिळवून दिली होती. पण ती टिकविणे त्यांना जमले नाही. अनिकेत रहाटे, रोहित मेहेर यांनी उत्तरार्धात धुव्वादार खेळ करीत विश्वरूप संघाला विजय मिळवून दिला. याच गटात नवी मुंबई प्रशिक्षण केंद्राने जयशिव संघाला 36-26 असे नमवित आपली घोडदौड सुरू ठेवली. अफताब मथुरा, रुपेश या विजयाचे शिल्पकार ठरले. विवेक किल्लेदार, यश जयंशिवकडून उत्कृष्ट खेळले. पुरुषांच्या अ गटातील सामन्यात श्री विठ्ठल मंडळाने एकवीरा संघाचा प्रतिकार 34-14 असा मोडून काढत आपली आगेकूच सुरूच ठेवली. विजयासंघाकडून चिन्मय गुरव, तर पराभूत संघाकडून हर्षल आपडकर छान खेळले.