शिक्षक पतसंस्थेला सर्वोतोपरी मदत करणार- आ. जयंत पाटील

| रायगड |
रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला भविष्यात कोणतीही मदत लागल्यास रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मदत करणार, असे आश्वासन आ. जयंत पाटील यांनी दिले. पतसंस्थेच्या प्रमुखांनी त्यांची शेतकरी भवन येथील कार्यालयात भेट घेत त्यांचा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील विजयाबद्दल, तसेच चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते.

रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी अलिबागतर्फे शेतकरी भवन येथील कार्यालयात जाऊन आ. जयंत पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी पॅनल प्रमुख राजेश सुर्वे, राजेंद्र म्हात्रे, नरेंद्र गुरव, भगवान घरत, चेअरमन सुशील वाघमारे, व्हाइस चेअरमन निलेश साळवी, मानद सचिव राजेंद्र पाटील तसेच संचालक मंडळ, संस्थेचे सचिव संदेश पाटील व सभासद सुबोध पाटील उपस्थित होते.

दरम्यान, आ. जयंत पाटील यांनी अलिबाग शिक्षक पतपेढीच्या कारभाराचा आढावा घेतला. पतसंस्थेची वार्षिक उलाढाल 112 कोटी असून, मार्च 2023 ते सप्टेंबर 2023 या सहामाही कालावधीत संस्थेला 1 कोटी 17 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, तसेच ठेवींवरील व्याजदरदेखील इतर पतसंस्थापेक्षा जास्त असून, वसुलीसाठी इसीएस पद्धत सुरू केल्याची माहिती पॅनल प्रमुख व संचालक राजेश सुर्वे यांनी दिली. आ. जयंत पाटील यांनी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल गौरवोद्गार काढले.

Exit mobile version