शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार- आ.जयंत पाटील

| चिरनेर | प्रतिनिधी |

विधिमंडळ एक ताकद आहे, या ताकदीचा वापर करून येथील जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावणार, अशी ग्वाही शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी दिली. त्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादनही आ. पाटील यांनी केले.

उरण तालुक्यातील जासई येथे शेतकरी आंदोलनाच्या लढ्याचा 40 वा. हुतात्मा दिन अभिवादन सोहळा 16 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. त्यावेळी ते आपल्या भाषणात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, कामगार नेते भूषण पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, सरपंच संतोष घरत, जेएनपीटीचे विश्वस्त रवी पाटील, दिनेश पाटील, सीमा घरत, नारायण घरत तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ. पाटील पुढे म्हणाले की, दि.बा. पाटील हे संघर्ष, चळवळ, वैचारिक विचारांचे होते. अन्यायाविरुद्ध लढणारे होते. शेतकऱ्यांच्या नाय्यहक्क चळवळीतील ते अग्रगण्य नेते होते. शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या या नेत्याचे, शेतकऱ्यांच्या चळवळीत विशेष योगदान आहे. दूरदृष्टी हा त्यांचा चांगला गुण होता. शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या उद्देशाने ते आयुष्यभर झटले. 1970 साली सिडको या भागात आली तेव्हा भेंडखळ येथे बैठक झाली होती. त्यावेळी वाजेकरशेठ होते. मीही या बैठकीला उपस्थित होतो.

दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले आहे. ते माझे मार्गदर्शक होते. असं सांगून येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमिनीचा परतावा मिळालेला नाही, ही त्यांची अडचण आपण सर्वजण एकत्र येऊन दूर करू. या महत्त्वपूर्ण गोष्टीवर निर्णय होईल. देशात हिताचे कायदे बनविण्याचे काम या भूमीने आणि इथल्या नेत्यांनी केले आहे. या जिल्ह्यात अनेक लढे झाले. हे वेगळं काम करण्याची आपल्याला संधी मिळत आहे, असे आ. पाटील म्हणाले.

कामगार नेते भूषण पाटील यांनी दि.बा. पाटील यांचे विमानतळाला नाव द्यावे, अशी आग्रही मागणी आपल्या भाषणातून केली. आरंभी हुतात्म्यांना मान्यवरांनी पुष्पमालिका व पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी ‌‘हुतात्मा अमर रहे व लाल सलाम, लाल सलाम’ या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता. दि.बां.चे सुपुत्र अतुल पाटील यांनी प्रास्ताविकेतून येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.

देशातील उरण, पनवेल, पेण तालुके सर्वात जास्त विकसित आहेत. या विकसित भागातील जमिनीला योग्य तो भाव मिळाला पाहिजे, यासाठी आपल्या सर्व नेतेमंडळींच्या सहकार्याची गरज आहे. या भागात नवनवीन प्रकल्प उभे राहात आहेत. या नवीन प्रकल्पांचे प्रशिक्षण केंद्र या भागात सुरू व्हावे यासाठी मी शासनाकडे मागणी केली असून, ती मान्यदेखील झाली. त्यामुळे आज कळंबोली येथे प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे.

आ. जयंत पाटील
Exit mobile version