शेकापचे आ.जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून वरसोली किनारी मार्गदर्शक स्तंभ

मच्छिमार सोसायटी, नाखवा संघाकडून धन्यवाद
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नांतून तालुक्यातील वरसोली खाडी मुखाजवळ मार्गदर्शक स्तंभाच्या रिंग बोयाची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठीची निविदा सुचना काढण्यात आली आहे. त्यामुळे आता हे काम लवकर मार्गी लागून खाडीत प्रवेश करताना मच्छिमार नौकांचा धोका कमी होणार आहे. जयंत पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रश्‍न मार्गी लागल्याने वरसोलीमधील मच्छिमार सोसायटी, नाखवा संघ, गाव पाटील आणि मच्छिमार समाजाने समाधान व्यक्त करीत जयंत पाटील आणि शेकापला धन्यवाद दिले आहेत.

समुद्रात मासेमारीसाठी जाताना तसेच परतत असताना वरसोली येथील खाडीतून प्रवेश करणे धोकादायक बनले आहे. मोठया प्रमाणावर मोठमोठया दगडांचा सामना करावा लागत असल्याने मच्छिमार नौकांसाठी हा मार्ग त्रासदायक झाला आहे. कोणताही दिशादर्शक मार्गदर्शक स्तंभ येथे नसल्याने धोका लक्षात येत नाही. त्यामुळे आतापर्यंत दोन नौकांना येथे जलसमाधी मिळाली आहे. त्यामुळे वरसोली खाडी मुखाजवळ मार्गदर्शक स्तंभाच्या रिंग बोयाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी कोळी समाजाने वारंवार करुन देखील शासन त्याकडे डोळेझाक करीत होते. शेवटी वरसोली कोळीवाडा येथे कोळी समाजाचे पाटील, पंच तसेच नाखवा संघाचे चेअरमन विविधी सोसायटीचे चेअरमन, खंडोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, मार्तंड देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अशा सर्वांनी एकत्र होत वरसोली ग्रामपंचायत सदस्य सुरेश घरत यांच्या सहकार्याने शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांना साकडे घालीत अन्याय निवारण्याची मागणी केली होती. त्यावेळी आ. जयंत पाटील यांनी झालेल्या अपघातामुळे पाय जायबंदी असताना देखील व्हीलचेअरवर बसून बंधार्‍याच्या झालेल्या नुकसानीची पहाणी करुन त्वरित संदर्भित अधिकारी वर्गासोबत प्रत्यक्ष बोलणी करून पंचनामा करून घेण्याचे निर्देश देत सर्व कोळीबांधवांना सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार आ. जयंत पाटील यांनी बंदरे विभागाला या संदर्भात पत्र देत तातडीने सदर बंधार्‍याची दुरुस्ती आणि वरसोली खाडी मुखाजवळ मार्गदर्शक स्तंभाची उभारणी करण्याची मागणी केली.

धुप प्रतिबंधक बंधार्‍यापासून 200 मीटर अंतरावर चाळमळा येथे खाडीमुखाजवळ मार्गदर्शक स्तंभाची उभारणी करण्याचे काम सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये राज्य शासनाच्या लेखाशिर्ष क्र. 30511835 (तरंगती जेट्टी व तत्सम प्रवाशी सुविधा उभारणे) या योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आले होते. सदर कामाचे 1.50 कोटी इतक्या किंमतीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले असून त्यासाठी लागणारी प्रशासकीय मान्यता मिळवून आता निविदा प्रक्रीयेला देखील सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सदर काम लवकरच मार्गी लागून प्रत्यक्षा या रिंग बोयाच्या उभारणीला सुरुवात होणार असल्याने वरसोली येथील कोळी समाजाने समाधान व्यक्त करीत आ. जयंत पाटील यांना धन्यवाद दिले आहेत. यावेळी मार्तंड विकास सहकारी संस्था, वरसोलीचे चेअरमन धर्मा घारबट, व्हाईस चेअरमन प्रभाकर पाटील, मार्तंड मच्छिमार नाखवा संघाचे चेअरमन दत्ताराम घारबट, व्हाईच चेअरमन शेखर बना, जय मल्हार मच्छिमार नाखवा संघाचे चेअरमन परशुराम दांडेकर, व्हाईस चेअरमन महेश कोळी यांच्यासह गावकीचे पाटील, पंच आणि ग्रामस्थांनी धन्यवाद देत समाधान व्यक्त केले आहे.

लाटांच्या मार्‍यामुळे खाडीच्या तोंडावर मच्छिमार बोटींना मोठा धोका होता. आतपर्यंत दोन बोटींना जलसमाधी मिळाली आहे. वारंवार मागणी करुन देखील शासन लक्ष देत नव्हते. मात्र आ. जयंत भाईंच्या कानावर घालताच ते जायबंदीं असताना देखील स्वतः वरसोली किनार्‍यावर येऊन त्या परिस्थितीत पाहणी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज हा प्रश्‍न मार्गी लागून रिंग बोया उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मच्छिमारांच्या वतीने त्यांना धन्यवाद.

– धर्मा घारबट, चेअरमन, मार्तंड विकास सहकारी संस्था, वरसोली

मच्छिमारांचे प्रश्‍न आपण जयंत भाईंच्या कानावर घातले. मच्छिमार समाजाबाबत विशेष प्रेम असल्याने आजारी असतानाही भाईंनी कसलीची तमा न करता त्वरीत वरसोली समुद्रकिनार्‍यावर येऊन अधिकार्‍यांना बोलावले. आणि त्वरीत सुचना देऊन हा प्रश्‍न मार्गी लावला.

– सुरेश घरत, वरसोली ग्रामपंचायत सदस्य

Exit mobile version