आ.जयंत पाटील यांच्या पारदर्शी नेतृत्वाने जिल्हा बँक देशात अव्वल- आ.भरत गोगावले

| महाड | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी, उद्योजक आणि स्थानिक कारागीर यांना वेळोवेळी अर्थसाहाय्य मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासात बँकेचे योगदान मोठे असून आ.जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीकोनामुळे जिल्हा बँक आज देशामध्ये अव्वल जिल्हा सहकारी बँक म्हणून नावारूपाला आली आहे, असे प्रशंसोद्गार आ. भरत गोगावले यांनी काढले. बँकेच्या महाड तालुक्यातील बिरवाडी शाखेच्या स्थलांतरित उदघाटनीय कार्यक्रमात ते बोलत होते.

अनेक नागरिक बँकेकडून कर्ज घेतात पण केवळ कर्ज घेणे एवढेच नागरिकांचे काम नसून त्या कर्जाची वेळेत परतफेड करणे हे सुद्धा महत्वाचे आहे, असेही त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. यावेळी बँकेचे चेअरमन आ.जयंत पाटील, उपाध्यक्ष सुरेश खैरे, माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, जि.प.माजी सदस्य चंद्रकांत कळंबे आणि मनोज काळीजकर तसेच जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंत जगताप, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन उतेकर, बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड, ज्ञानेश्‍वर भोईर, गणेश मढवी, वसंत सकपाळ, श्रेयसी गांगल, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर वाघमोडे आणि बँकेचा अधिकारी वर्ग उपस्थित होते.

गतवर्षी पोलादपूर, बिरवाडी, महाड येथे पुरामुळे मोठ्या प्रमाणावर बँकेचे नुकसान झाले होते, तसेच यातील काही शाखा अद्यावत आणि सुसज्ज असण्याकरिता बँकेने यातील काही शाखांचे नव्या जागेत स्थलांतर केले तर विन्हेरे -नागाव विस्तारीत कक्ष येथे नव्या शाखेचे उद्घाटन बँकेचे चेअरमन आ.जयंत पाटील यांच्या हस्ते केले. खाजगी बँका, तसेच राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण भागामध्ये फारश्या सक्रिय नसताना जिल्हा सहकारी बँकेने मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग प्रवाहामध्ये आणण्यासाठी महाड तालुक्यातील विन्हेरे-नागाव येथे विस्तारीत कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकेचा जिल्ह्यातील विस्तार 59 शाखा आणि अलिबाग येथे केंद्र कार्यालय असा झालेला आहे.

बिरवाडी शाखेच्या कार्यक्रमामध्ये बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बँकेचे माजी चेअरमन चंद्रकांत देशमुख यांच्या कारकीर्दीमध्ये जिल्हा सहकारी बँकेची जी धोरणे आखली गेली ती अधिक व्यापक आणि दूर दृष्टीकोनातून पुढे नेण्यासाठी मला उपयोगी पडली, याबाबत त्यांनी चंद्रकांत देशमुख यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. तसेच बँक येत्या काही वर्षात 5000 कोटींचा व्यवसाय टप्पा ओलांडून 1000 कोटींच्या स्वनिधीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांनी ज्यामध्ये ठेवीदार, कर्जदार, बँकेच्या सभासद संस्था भागधारक यांच्या सहकार्यामुळे आणि विशेषता विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बँकेबाबत सकारात्मक भूमिका ठेवल्यामुळे बँकेची घौडदौड यशस्वी ठरत आहे, असेही पाटील यांनी आपल्या भाषणात मत व्यक्त केले.

Exit mobile version