कुस्ती स्पर्धेत शेकडो मल्लांचा सहभाग
| खोपोली | प्रतिनिधी |
कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यासाच्यावतीने “कुस्ती महर्षी रायगड केसरी” जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत खालापूरच्या जयेश खरमारे याने रायगड केसरी हा मानाचा किताब पटकावला. तर, अंतिम फेरीत दिवेश पालांडे याने उपविजेतेपद पटकावले.
खोपोलीतील काशी स्पोर्ट्स क्लब येथे पार पडलेल्या या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेकडो मल्लांनी सहभाग घेतला होता. त्यात वरिष्ठ पुरुष, महिला तसेच 16 वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध वजनगटांतील लढती दिवसभर रंगल्या. या स्पर्धेच्या समारंभाला रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष परेश ठाकूर, पंचायत समितीचे सभापती कृष्णाजी पारंगे, जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे, खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. रायगडमधील कुस्ती परंपरा जपण्यासाठी अशा स्पर्धा सातत्याने आयोजित करण्याची गरज असल्याचे मत यावेळी प्रमुख उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आले. स्पर्धेदरम्यान सोहेल शेख, क्षितिजा मरागजे, काव्या मरागजे आणि ओमकार निंबळे यांच्या कुस्त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
स्पर्धा पार पडल्यानंतर रायगड केसरी विजेता जयेश खरमारे व उपविजेता दिवेश पालांडे यांचा मानाची गदा, रोख पारितोषिक, पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. पुरुष विभागातील विजेत्याला कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या स्मरणार्थ, तर महिला विभागातील विजेत्यास स्व. किसन मामा शेलार यांच्या स्मरणार्थ मानाची गदा प्रदान करण्यात आली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यासाचे अध्यक्ष राजाराम कुंभार, सचिव जगदीश मरागजे, पदाधिकारी, पंच, प्रशिक्षक, स्वयंसेवक तसेच हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
