| चिरनेर | प्रतिनिधी |
केगाव येथील मानस जयेश पाटील या सहा वर्षीय चिमुरड्याने पीरवाडी बीच ते जेएनपीए बंदर हे 17 किमी सागरी अंतर 4 तास 49 मिनिटे आणि 50 सेकंदात पार केले. चिमुरड्याच्या धाडसाचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
केगाव-उरण येथील जयेश पाटील यांचा सहा वर्षीय मानस हा मुलगा आहे. पोहण्याची आवड असलेल्या मानसला पीरवाडी बीच ते जेएनपीए बंदर दरम्यानच्या अरबी समुद्रात पोहण्यास उतरविण्याचा इच्छा मानसच्या आईवडिलांनी प्रशिक्षक संतोष पाटील यांच्याकडे व्यक्त केली होती. इच्छा व्यक्त करताच प्रशिक्षक संतोष पाटील यांनीही मानसला पोहण्याचे धडे देण्यास सुरुवात केली होती. प्रशिक्षणाला वर्षाचा कालावधी लागला असता. मात्र मानसच्या अफाट प्रतिसादामुळे चार महिन्यांच्या प्रशिक्षणातच त्यांनी बलाढ्य लाटांचा सामना कसा करायचा, प्रतिकुल हवामान आणि समुद्राच्या उलट-सुलट प्रवाहात कसे पोहायचे याचे शास्त्रोक्त पद्धतीचे प्रशिक्षण दिले. ते त्यांनी चांगल्या प्रकारे आत्मसातही केले. प्रशिक्षणानंतर पोहण्यात मानस तरबेज झाल्याची खात्री पटल्यानंतर मानसला पीरवाडी बीच ते जेएनपीए बंदर हे 17 किमी सागरी अंतरासाठी पोहण्यासाठी सज्ज केले. यासाठी त्यांनी 6 मार्चच्या तारखेचा दिवसही नक्की केला. या मोहिमेसाठी येथील जीटीआय कंटेनर टर्मिनलनेही मदतीसाठी पुढे केला. शुक्रवारी (6) मानस पीरवाडी बीचवरुन समुद्रात झेपावला.पीरवाडी बीच नागाव, केगाव ते जेएनपीए बंदर या सागरी अंतरा दरम्यान क्षणाक्षणाला उलटसुलट वाहाणाऱ्या प्रवाहामुळे अत्यंत धोकादायक मानला जातो.तसेच या दरम्यान सातत्याने अवाढव्य आणि अजस्त्र मालवाहू जहाजांच्या वाहतुकीच्या वर्दळीमुळे आणखीनच आव्हानात्मक ठरतो.
अशा या धोकादायक समुद्रात झेपावलेल्या मानसने पीरवाडी बीच ते जेएनपीए बंदर हे सागरी अंतर कापण्यास सुरुवात केली होती. मात्र, अनुकूल परिस्थिती आणि चिअर अप, प्रोत्साहन देण्यासाठी आलेले कुटुंबिय यांच्या जोरावर सहा वर्षीय चिमुरड्यांने पीरवाडी बीच ते जेएनपीए बंदर हे 17 किमी सागरी अंतर 4 तास 49 मिनिटे आणि 50 सेकंदात पार केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय चा घोष करीत मानसनेही आपला आनंद व्यक्त केला. चिमुकल्याच्या या धाडसाचे परिसरातील अनेकांकडून कौतुक केले जात आहे.







