जेलिफिशचा विळखा ठरतोय जीवघेणा

जिल्हा मच्छीमार संघ करणार संशोधन; जिल्हा अध्यक्ष शेषनाथ कोळी यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेल्या दोन तीन वर्षांपासून विविध संकटा मागून संकटाच्या जाळ्यात अडकलेल्या रायगडच्या मच्छिमारांना आता जेली फिशच्या आक्रमणामुळे नुकसानीच्या भोवर्‍यात अडकवले आहे. चक्रीवादळ, अतिवृष्टी, लोकडाऊन आदी संकटातुन झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळालेली नसताना आता शासनाकडून मदतीची अपेक्षा करणेच व्यर्थ असल्याचे सांगताना रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे अध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी जेली फिश च्या संकटावर मात करण्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता संघटनेकडून संशोधन करण्यात येणार असल्याचे सांगितले. शेषनाथ कोळी म्हणाले की, गेले 15 दिवस आमच्या बोटी इथेच किना-यावर आहेत. अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यात समुद्रकिनारी जवळपास हजारो मच्छीमार बोटींनी गेल्या अनेक दिवसांपासून जेली फीशच्या भीतीने ग्रासले असल्याने नांगर टाकलाय. मासळी मिळत नसल्याने मच्छीमारांकडे बोटी उभ्या ठेवण्यावाचून पर्यायच उरला नाही. जेली फिशला स्थानिक भाषेत बोंगलदिवे असे म्हणतात. गेले 15 दिवसांपासून रायगडच्या किना-यांवर जेली फिश आढळले होते. अलीकडे इथल्या समुद्रात जेली फिशचा वावर वाढलाय. त्याने डंख केला तर दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय नाही. त्याच्या भीतीने खलाशी बोटीवर जायला तयार नाहीत.

किनार्‍यावर शुकशुकाट
बोट समुद्रात नेली तर डिझेल आणि इतर बाबींवर पैसे खर्च अंगावर पडतो. मासे मिळत नसल्याने खलांशांना पैसे देता येत नाहीत. त्यामुळे मासेमारी करणे आता परवडत नाही. खोल समुद्रात होत असलेल्या पर्सनेट मासेमारीमुळे छोटया मच्छीमारांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. अलिबाग तालुक्यातील रेवस, थळ, नवगाव, साखर, अलिबाग, आक्षी, रेवदंडा तसेच मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा अशा सर्वच तालुक्यातील मच्छीमारांची व्यथा यापेक्षा वेगळी नाही. तेथील बंदरांवर असाच शुकशुकाट पहायला मिळतो आहे. .

Exit mobile version