मच्छिमारांना बसतोय आर्थिक फटका
| मुरूड जंजिरा | वार्ताहर|
वादळी हवामानामुळे मधल्या काळात मासेमारी ठप्प झाली होती. आता मासेमारीला जोर आला असला तरी, समुद्रामध्ये जेलीफिशचे संकट ओढवल्याने मासेमारीला उतरती कळा लागली आहे. खोल समुद्रात मासेमारी करताना जाळ्याच मासे कमी आणि कचरा अधिक सापडत असल्याने मच्छिमार दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र आहे. समुद्रामध्ये विविध जीव राहतात. त्यातीलचएक प्रकार म्हणजे जेलीफिश होय. जेलीफिशमुळे अंगाला खाज सुटते, त्वचेच्या समस्या निर्माण होतात. सध्या जोरदार वावर आढळत आहे. त्यामुळे कोलंबी, पापलेट अशा प्रकारची मासळी जेलीफिशपासून पलायन करते.
मासेमारी करणाऱ्यांना अधिक खोल समुद्रात जावे लागत आहे, मात्र त्यांच्या जाळ्यात मासे कमी आणि प्लॅस्टिकचा कचरा अधिक सापडत आहे. जेलीफिशसह कचऱ्याचे दुहेरी संकट मासेमारीच्या मुळावर उठल्याचे चित्र आहे.
मंगळवारी सकाळी सुमारे 40 यांत्रिक नौका कोळंबी मासेमारीसाठी गेल्या होत्या. परंतु त्यांना समाधानकारक कोळंबी मिळू शकली नाही. त्या ऐवजी जाळयात कचरा, पालापाचोळाच अधिक मिळाला. तो साफ करण्यासाठी मेहनत घ्यावी लागत, असल्याची माहिती रोहन निशानदार यांनी दिली. समुद्रात जेलिफिश आल्याने मासेमारीवर मोठा परिणाम झाला आहे. आता कोलंबिचा सिझन असला, तरी जेलिफिश कोलंबी मासळीला फस्त करीत असते. पापलेट, सुरमई, रावस सारखी मोठी मासळी दूरवर पलायन करते, अशी माहिती रोहन निशानदार यांनी दिली.
येथील नौका सकाळी मासेमारीस गेल्या होत्या, परंतु मासळी न मिळाल्या राजपुरी बंदरात परतल्या आहेत. हवामानात होणाऱ्या परिणामामुळे मासळी गायब झाली. ऐन हंगामामध्ये मासळीचा दुष्काळ पडला, असल्याची माहिती राजपुरीचे धनंजय गिदी यांनी दिली.
सध्या मुऱ्या नावाचे समुद्री खेकडे बाजारात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. खाडीकिनारी चिखलात मिळणारे खेकडे आणि समुद्रात मिळणारे मुऱ्या नावाचे खेकडे यात थोडा फरक आहे. मात्र मुऱ्या खेकडे खाण्यासाठी चविष्ठ लागत असल्याने त्याला चांगली मागणी होती, असे महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी स्पष्ट केले.