बोगदा खोदून ज्वेलर्सवर दरोडा

सुरक्षा रक्षकानेच चोरी केल्याचा व्यापाऱ्यांना संशय

| पालघर | प्रतिनिधी |

पालघर शहरातील मुख्य भाजी बाजारात असलेल्या एका प्रसिद्ध सराफा दुकानात शेजारच्या दुकानातून बोगदा (सुरंग) करून प्रवेश करत चोरट्याने लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर इमारतीतील सुरक्षा रक्षकही गायब असून, सुरक्षा रक्षकानेच हा प्रकार केल्याचा प्राथमिक संशय येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पालघर शहरातील मुख्य भाजी बाजारातील अंबर शॉपिंग मॉल येथे कपड्यांसह ज्वेलर्सची अनेक दुकाने आहेत. याच मॉलमध्ये असलेल्या नाकोडा ज्वेलर्स या दुकानाला चोरट्याने लक्ष्य केले. ही घटना काल मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेच्या दरम्यान घडली असावी, असा अंदाज आहे. चोरट्याने ज्वेलर्सच्या शेजारी असलेल्या कपड्याच्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपड्याच्या दुकानातून बोगदा (सुरंग) तयार करून ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. ज्वेलर्सच्या दुकानातील तिजोरी कापून त्यामध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटा फरार झाला.

चोरी झालेल्या इमारतीमध्ये असलेला सुरक्षा रक्षक देखील या घटनेनंतर गायब झाला आहे. यामुळे हा प्रकार सुरक्षा रक्षकानेच केल्याचा प्राथमिक अंदाज येथील व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. दुकानावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर देखील चोरट्याने कापल्याचे सांगण्यात येत आहे. या चोरीबाबत पहाटे पालघर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. माहिती मिळताच पालघर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाच्या ठिकाणावरून बोटांचे ठसे आणि इतर पुरावे शोधण्याचे काम सुरू केले आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पालघर पोलिसांनी सांगितले असले तरी, चोरीला गेलेल्या सोन्याच्या किमतीचा अचूक आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

व्यापाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण
या भागात मोठ्या प्रमाणात सराफाची दुकाने असल्यामुळे या घटनेमुळे इतर दुकानदारांच्या मनातही भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानांवर नवीन सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, सध्या कार्यरत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षित आहेत की नाहीत, याची तपासणीही इतर दुकानदार करत आहेत.
Exit mobile version