| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रमेश ज्वेलर्स या दुकानातून भरदिवसा दागिने चोरीला गेले होते. नेरळ पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवून एका चोराला अटक केली असून एक चोर अद्याप फरार आहे.
डिकसळ येथे रमेश ज्वेलर्स या नावाचे दुकान आहे. 12 डिसेंबर रोजी या दुकानाचे मालक हर्षवर्धन बिरगळ हे दुकानात असताना दुपारी सव्वा वाजता एक दुचाकी त्यांच्या दुकानासमोर येवून थांबली. 30-40 वयोगटातील दोन व्यक्ती दुचाकीवरून उतरून दुकानात आल्या. सोन्याची बाली पाहिजे, अशी मागणी केल्यावर दोन ग्रॅम वजनाची सोन्याची बाली दुकानदाराने दाखविण्यासाठी डब्बा बाहेर काढला. डब्बा बाहेर काढताच त्या दोघांपैकी एकाने तो डब्बा खेचून घेतला. त्यावेळी बिरगळ यांनी त्या तरुणाचा शर्ट पकडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दोन्ही अनोळखी तरुणांनी डब्बा हिसकावून घेत दुकान मालकाला ढकलून तेथून पळ काढला. ते पळून गेल्यानंतर या घटनेची आरडाओरड झाली. रमेश ज्वेलर्सचे मालक यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली.
नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी तात्काळ डिकसळ येथील रमेश ज्वेलर्समध्ये पोहचून घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर कर्जत-नेरळ, कर्जत-मुरबाड आणि चिंचवली -कडाव या रस्त्यावर नाकाबंदी करून तपास सुरू केला. खबऱ्यांच्या माध्यमातून पोलीस त्या अनोळखी चोरापर्यंत पोहचले आणि रमेश ज्वेलर्समधून एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बाल्या चोरणाऱ्या एकाला ताब्यात घेतले. तरुणाने गुन्हा कबूल केला असून नेरळ पोलिसांकडून दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपीला कर्जत दिवाणी न्यायालयात हजर केले असता त्याला 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.