। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
करंजाडे परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सुमारे 57 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाणे येथे मंगळवारी (दि.17) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रीया कांबळे या करंजाडे येथील सिद्धिविनायक प्रारंभ सोसायटी, सेक्टर आर-3 येथे वास्तव्यास आहेत. त्या घराबाहेर गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. घरातील कपाटांची उचकापाचक करून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.
चोरीची बाब लक्षात येताच प्रीया कांबळे यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू करण्यात आली असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.
करंजडे परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, नागरिकांनी घर बंद ठेवताना योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.







