लाखो रुपयांचे दागिने, रोख रक्कम लंपास

ज्वेलर्स बंधुंचा पोलिसांकडून शोध सुरु
पनवेल | वार्ताहर |
ऐरोली सेक्टर-8 भागात विकास ज्वेलर्स नावाने ज्वेलर्स दुकान चालवणार्‍या दोघा भावांनी ऐरोलीतील अनेक लोकांकडून उसनवारीने दागिने व लाखो रुपये घेऊन त्यांचे दागिने व रोख रक्कम त्यांना परत न करता दुकान बंद करुन पलायन केल्याचे उघडकिस आले आहे. विकास जैन व धर्मेंद्र जैन अशी या दोघा भावांची नावे असून, रबाळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणातील आरोपी विकास जैन व धर्मेंद्र जैन या दोघा भावांनी ऐरोली सेक्टर-8 मध्ये विकास ज्वेलर्स नावाने दुकान थाटले होते. त्यामुळे त्यांची ऐरोलीतील अनेक लोकांसोबत चांगली ओळख झाली होती. या दोघांनी 2017 मध्ये आर्थिक अडचण असल्याचे सांगून आपल्या ओळखीतल्या काही लोकांकडून उसनवारीने पैसे व दागिने घेतले होते. सुरुवातीला त्यांनी त्यांचे दागिने व रोख रक्कम वेळेत परत करुन त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर जैन बधुंनी डिसेंबर-2020मध्ये आर्थिक अडचण असल्याचे सांगून मुलुंड येथे राहणारे सोमनाथ सानप यांच्याकडून 1 लाख रुपये रोख व 6 लाख 15 हजार रुपये किंमतीचे 131 ग्रॅम वजनाचे दागिने 15 दिवसांसाठी मागून घेतले होते. तसेच त्याबदल्यात 10 हजार रुपये व त्या कालावधीत दागिने न दिल्यास 10 टक्के दराने दंड देण्याचे मान्य केले.
मात्र महिना लोटल्यानंतर देखील जैन बंधुकडून सानप यांना मोबदला अथवा परतावा न मिळाल्याने सानप यांनी त्यांना संपर्क साधला असता, त्यांनी कोरोनामुळे अडचण आल्याचे सांगून सानप यांना पैसे आणि दागिने देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतरदेखील सानप यांनी जैन बंधुंना अनेकवेळा संपर्क साधला मात्र, त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. याचदरम्यान जैन बधुंनी सानप यांचे भाऊ संपत सानप यांच्याकडून देखील सुमारे 10 लाख रुपये किंमतीचे 213 ग्रॅम 760 ग्रॅम वजनाचे दागिने 12 महिन्यांच्या अटीवर घेतल्याचे व त्यांचे दागिने सुद्धा देण्यास ते टाळाटाळ करत असल्याचे सानप यांना समजले. त्यानंतर सानप बंधुंनी जैन बंधूंच्या दुकानावर जाऊन पाहणी केली असता, ते दुकान बंद करुन पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर सानप यांनी त्यांची अधिक माहिती काढली असता, जैन बधुंनी त्यांच्याप्रमाणेच ऐरोलीतील अनेक लोकांकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पलायन केल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेऊन पार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी जैन बधुं विरोधात फसवणुकिसह अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

Exit mobile version