झुंझार पोयनाड क्रिकेट स्पर्धेत आरुष कोल्हे, आदित्य शेंडे, क्रिश पाटीलचे शतक

। पोयनाड । प्रतिनिधी ।
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित चौदा वर्षा खालील मुलांसाठीच्या लेदर बॉल एक दिवसीय 40 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत एसबीसी महाड संघाचे सलामीचे फलंदाज आरुष कोल्हे, आदित्य शेंडे यांनी तर पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रिश पाटील यांनी शतकाची नोंद स्पर्धेत केली. आतापर्यंत स्पर्धेत 5 खेळाडूंनी शतके केली आहेत. एसबीसी महाड संघाच्या सलामीचे फलंदाज आरुष कोल्हे आणि आदित्य शेंडे यांनी वरसोली क्रिकेट टीम अलिबाग विरुद्धच्या सामन्यात दमदार शतक केले. आरुष कोल्हे नाबाद 105 तर आदित्य शेंडे यांनी 109 धावा धावफलकावर नोंदवल्या.त्यांनी 244 धावांची भागीदारी केली. 40 षटकांच्या समाप्ती नंतर महाड संघाने 5 गडी गमावत 325 धावांचे आव्हान वरसोली संघासमोर ठेवले. त्याला प्रतिउत्तर देताना वरसोली संघाचा डाव 211 धावाता आटोपला. महाड संघाने सामना 111 धावानी जिंकला.


दुसर्‍या दिवशीच्या सामन्यात पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीचा सलामीचा अष्टपैलू खेळाडू क्रिश पाटील यांनी महाड विरुद्ध झालेल्या सामन्यात दमदार शतक करत, नाबाद 105 धावा काढल्या. श्रवण खारोलच्या 45 धावांच्या साथीने त्यांनी महाड संघावर एकतर्फी विजय पनवेल संघाला मिळून दिला. यावेळी झुंझार युवक मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, सचिव किशोर तावडे, खजिनदार दिपक साळवी, सदस्य अजय टेमकर स्पर्धा समितीचे सदस्य सुजित साळवी, इम्रान बुराण, अ‍ॅड.पंकज पंडित, संदिप सावंत आदींनी शतकवीरांचे सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन केले.

Exit mobile version