थळ जिल्हा परिषद मतदार संघातून सानिका सुरेश घरत यांची घोषणा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
राजमाता जिजाऊंनी महाराष्ट्राला सुसंस्कार, शिस्त, आणि चारित्र्याची शिकवण दिली. जिजाऊ कधीही शिवीगाळ करणाऱ्या नव्हत्या. आज मात्र शिव्या देणाऱ्यांनाच जिजाऊ पुरस्कार दिला जातो, ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, तो राजमाता जिजाऊंचाच अपमान आहे, अशी घणाघाती टीका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी शिंदे गटातील मानसी दळवी यांच्यावर केली. अलिबाग थळ जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवारी जाहीर करताना जयंत पाटील बोलत होते. ज्या व्यक्तीच्या वागण्यातून संस्कारांचा अभाव दिसतो, अशा व्यक्तींना जिजाऊंच्या नावाचा पुरस्कार देताना जिजाऊंनाही वेदना झाल्या असत्या, असा टोला लगावत त्यांनी सध्याच्या राजकारणाच्या अधोगतीवर गंभीर भाष्य केले.
दरम्यान, जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद थळ मतदार संघासाठी शेकापच्या उमेदवार म्हणून सानिका सुरेश घरत यांची घोषणा करीत एक सुशिक्षित व उच्च शिक्षित उमेदवार सानिका घरत यांना निवडून देण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. हा विजय महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा इतिहास घडवेल, असेही ते म्हणाले.
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थळ जिल्हा परिषद मतदार संघातून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार म्हणून सानिका सुरेश घरत यांची अधिकृत घोषणा जयंत पाटील यांनी रविवारी (दि.18) अलिबागमध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सभेच्यावेळी जाहीर केली. सानिका घरत या उच्चशिक्षित असून, वकिलीचे शिक्षण घेत आहेत. त्या शेकापचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांची कन्या आहेत. महिला आरक्षित मतदार संघात केवळ घराणेशाही नव्हे, तर अनेक वर्षांच्या संघर्ष, जनसंपर्क आणि सामाजिक कामाची पार्श्वभूमी पाहून ही उमेदवारी देण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप कामगार आघाडी प्रमुख ॲड. प्रदीप नाईक, शेकाप ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, थळ जिल्हा परिषद मतदार संघातील शेकाप उमेदवार सानिका घरत, अलिबागचे नगरसेवक अनिल चोपडा, जमाल सय्यद, अशोक प्रधान, प्रफुल्ल पाटील, ॲड. किशोर हजारे, दत्ता ढवळे, आरडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, तुकाराम लडगे, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, प्रमोद घासे आदींसह वेगवेगळ्या आघाड्यांचे पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, शेकापच्या माध्यमातून थळ, नवगाव, वरसोली परिसरात रस्ते, सिमेंट काँक्रिट मार्ग, रिक्षा स्टँडचे रस्ते, बंधारे यांसारखी महत्त्वाची विकासकामे करण्यात आली. मात्र, आम्ही कधीही त्या कामांची जाहिरात केली नाही. वरसोली येथील बंधारा आपण मंजूर केला आहे. मात्र, कधी फलकबाजी केली नाही. परंतु, काम आम्ही करायचे आणि नारळ फोडायला विरोधक पुढे, हा सध्याचा राजकीय प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.
अलिबागची आमदारकी कधी काळी महाराष्ट्राला दिशा देणारी होती. नाना कुंटे, मधुकर ठाकूर यांसारख्या आमदारांनी चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि लोकहित जपले. त्यांनी कोणाचे पैसे खाल्ले नाहीत, असा टोला शेकाप नेते जयंत पाटील यांनी लगावत अलिबागच्या राजकीय इतिहासाची आठवण करून देते आजच्या सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, थळ ग्रामपंचायतीला आरसीएफ कंपनीकडू साडेसात कोटी रुपयांची घरपट्टी मिळते. या व्यवहारांचे स्पेशल ऑडिट झाले तर अनेकांवर गुन्हे दाखल होतील, असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला.थळ मतदार संघात रस्ते, पाणी, रोजगार, कोळीवाड्यांचे प्रश्न प्रलंबित असताना कोट्यवधी रुपयांचा वापर नेमका कुठे झाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जयंत पाटील म्हणाले की, सध्या निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात धनशक्तीचा वापर होत आहे. मात्र, शेतकरी कामगार पक्ष हा जनशक्तीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. सुरेश घरत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात प्रभावशाली काम केले आहे. थळ मतदार संघातील वेगवेगळे प्रश्न मार्गी लावले आहेत. किमान वेतन मिळावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. या मतदार संघात त्यांनी चांगला संपर्क ठेवला आहे. थळ जिल्हा परिषद मतदारसंघ महिला राखीव असून, सुरेश घरत यांनी या भागात अनेक वर्षांपासून केलेल्या जनसंपर्काच्या कामाचा विचार करून त्यांच्या मुलीला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सानिका घरत या उच्चशिक्षित असून, त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. थळ मतदार संघ पुन्हा आपण घेऊ शकतो. त्यापद्धतीने कार्यकर्त्यांनी कामाला लागणे गरजेचे आहे. प्रचारासाठी कमी दिवस आहेत. रात्रीचा दिवस करून प्रत्येकाने मतदारांपर्यंत पोहोचून काम करायचे आहे. सानिका घरत या सुशिक्षित उमेदवार आहेत. आम्ही सुशिक्षित आणि चारित्र्यवान उमेदवारांना संधी देत आहोत. कमी वेळात प्रचार करायचा असून, प्रत्येक कार्यकर्त्याने रात्रंदिवस काम करावे, असे त्यांनी आवाहन केले.
सानिका घरत यांची उमेदवारी जाहीर
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अलिबाग तालुक्यात सात जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गण आहेत. थळ जिल्हा परिषद मतदार संघासाठी (गट) शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार सानिका सुरेश घरत यांची निवड केल्याचे शेकाप नेते जयंत पाटील यांनी जाहीर केले. सानिका घरत या शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांची कन्या आहेत. त्या वकिलीचे शिक्षण घेत असून, उच्च शिक्षित उमेदवार आहेत. त्याची जिल्हा परिषद थळ मतदार संघासाठी उमेदवार म्हणून निवड जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.











