अंगणवाडी सेविका ते वकील; एक यशस्वी जीवन प्रवास..

जिवीता पाटील एलएलबी परीक्षा उत्तीर्ण

। अलिबाग । विषेश प्रतिनिधी ।

ऐन तारुण्यात पतीच्या निधनानंतर पदरात असलेल्या लेकासोबत संघर्ष करीत बीएडचे शिक्षण घेवून, अंगणवाडी सेविका म्हणून गेली 12 वर्षे काम करणाऱ्या जिवीता पाटील यांनी थेट एलएलबी ही कायद्याची परीक्षा देत, दिवस रात्र मेहनत घेवून चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. अंगणवाडी सेविका असणाऱ्या जिवीता पाटील यांच्या नावापुढे आता ॲडव्होकेट ही पदवी लागणार असल्याने रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या जिवीता पाटील या एम.ए.बीएड असून त्यांनी एम.एस.डब्ल्यू ही पदव्युत्तर पदवी देखील यापूर्वी मिळवली आहे.

जिविता पाटील या 21 व्या वर्षाच्या असताना त्यांचे पतीचे निधन झाले. पदरात एक वर्षाचे मुल घेवून त्यांनी आपला जीवनसंघर्ष सुरू केला. जिविता पाटील या एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प अलिबाग अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या चिखली विभागातील नवीन वाघविरा गावात अंगणवाडी सेविका असून त्यांनी त्यांचे शिक्षण त्यांच्या सासू मनोरमा हरिश्चंद्र पाटील यांच्या सहकार्याने व पाठिंबामुळे पूर्ण केले. बेताची परिस्थिती असताना त्यांनी भाजीचा व्यवसाय करून को. ए.सो. लक्ष्मी शालिनी कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय पेझारी पोयनाड येथून प्रथम श्रेणीत बी.एची पदवी प्राप्त केली. त्यानंतर एच.बी.बी.एड कॉलेज वाशी येथून बी.एडची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. त्यानंतर एम.ए, एम.ए.एज्युकेशन, एम.फिल इ. पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत मुंबई युनिव्हर्सिटी मधून प्राप्त केल्या. तर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, खारघर शाखा येथून एम.एस.डब्ल्यू ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली.

याशिवाय नुकतीच त्यांनी को.एसो.ॲड.दत्ता पाटील लॉ कॉलेज अलिबाग येथून एल.एल.बीची शेवटच्या वर्षाची परीक्षा देत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा सन्मान संपादन केला आहे. त्यांना पुढे त्यांच्या सामाजिक कार्यातूनच एलजीबीटी लोकांच्या समस्या या विषयावर पीएचडी करण्याचा मानस आहे. त्यांना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच साहित्यिक या क्षेत्रांची आवड असून प्रत्येक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे आणि म्हणूनच त्यांना मागच्याच वर्षी दिल्ली पार्लमेंट कडून भारतभूषण पुरस्कार 2022 देवून दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. त्यांना साहित्यिक क्षेत्रातून 5 राज्यस्तरीय, सामाजिक क्षेत्रातून 1 राष्ट्रीय स्तरावरील तर 1 महाराष्ट्र शासनाचा आणि 3 राज्यस्तरीय तसेच सांस्कृतिक व शैक्षणिक स्तरावरील अनेक जिल्हा व तालुका स्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तेजस्विनी फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला असून आजतागायत त्या अनेक जाणीव जागृतीचे कार्यक्रम राबवित आहेत.

जिल्हा न्यायालय अलिबाग येथे त्यांनी विधी सेवा प्राधिकरणात न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जाणीव जागृतीचे कार्यक्रम घेवून शासनाच्या मोफत योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना प्राधिकरणाचा लाभ मिळवून देण्यात भरीव कार्य केले आहे. कोरोना काळातील कामगिरी, शासकीय व निमशासकीय संस्थांना मदतीचा हात देवून आपले कर्तव्य पार पाडीत असतात. आत्तापर्यंत त्यांनी 47 मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतले असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्या उचलीत आहेत. पुढे जावून संस्थेच्या माध्यमातून समाजातील विधवा, परितक्त्या, निराधार मातांसाठी रोजगारा संदर्भात मार्गदर्शन करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे. हे कार्य करीत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तरीही न डगमगता त्या त्यांचे कार्य अविरतपणे करीत असतात. ध्येय न सोडता त्यांनी एल.एल.बी. उत्तीर्ण होवून अंगणवाडी एक अंगणवाडी सेविका कुठपर्यंत मजल मारू शकते हा आदर्श समाजापुढे ठेवला. त्यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version