संविधानदिनी जेएनपीए चॅनेल बंद आंदोलन

शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेतर्फे इशारा

। उरण । वार्ताहर ।

जेएनपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा 256 कुटुंबांनी 39 वर्षे उलटूनही शासनाचे मापदंडाने मंजूर असलेले पहिले पुनर्वसनाचे काम चालू करण्यासाठी दि. 2 ऑक्टोबर रोजी जेएनपीटी चॅनेल बंद आंदोलन जाहीर केले होते. ते पुढे ढकलून संविधानदिनी म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजी जेएनपीए (जेएनपीटी)चे समुद्रातील मार्ग अडवून चॅनेल बंद आंदोलन करणार असल्याची माहिती शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेतर्फे देण्यात आली आहे.

यासंदर्भात उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), रायगड, सहाय्यक पोलीस आयुक्त, न्हावा शेवा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मोरा पोलीस ठाणे यांनी विस्थापितांसोबत जेएनपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिरातील हनुमान मंदिरात दि. 1 ऑक्टोबर रोजी बैठक घेतली. त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जेएनपीएने जेएनपीटी कामगार वसाहतीला लागून जसखार व फुंडे गाव नकाशातील जेएनपीए प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील 256 कुटुंबांचे शासनाचे मापदंडाने दि.12 नोव्हेंबर 1982 ते 12 मार्च 1987 मध्ये पायरी-पायरीने मंजूर असलेले पहिले पुनर्वसन करण्यासाठी दिलेल्या विकसित जमिनीत दि. 3 ऑक्टोबरपासून नागरी सुविधेची कामे सुरू करणे मान्य केले, शेवा कोळीवाडा गावठाणाच्या नकाशास शेवा भाग 3 देऊन 256 भूखंडांना व नागरी सुविधेच्या भूखंडांना स्वतंत्र गाव नमुना 7/12 ना शेवा सर्व्हे नंबर देऊन प्रत्येक भूखंडधारकांना शेवा सर्व्हे नंबरचे 7/12 वाटप करणे मान्य केले. पुनर्वसनाची सर्व कामे मान्य केली ती दि.15 नोव्हेंबर 2024 रोजीच्या आत पूर्ण करण्याची लेखी हमी मा.उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन), रायगड व जेएनपीए व्यवस्थापन यांच्या दोघांच्या सहीने दि. 1 नोव्हेंबर 2024 रोजी दिली आहे. त्या दिलेल्या कालावधीपुरता विश्‍वास ठेवून विस्थापितांनी दि. 2 ऑक्टोबर रोजीचे जेएनपीटी चॅनेल बंद आंदोलन पुढे ढकलून संविधानदिनी करण्यात येणार आहे.

Exit mobile version