जेएनपीएची विक्रमी माल हाताळणी

| उरण । वार्ताहर ।

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण अर्थात जेएनपीए हे भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे बंदर असून जेएनपीएने वर्ष 2022 मध्ये विक्रमी मालहाताळणी केली आहे. या पूर्ण वर्षभरामध्ये एकूण 59 लाख 59 हजार 112 टीईयू कंटेनरची वाहतूक करण्यात आली आहे. याआधीच्या 2021 यावर्षी 56 लाख 31 हजार 949 टीईयू कंटेनरच्या तुलनेत यंदाची मालहाताळणी 5.81 टक्के अधिक आहे. जेएनपीएने 2022मध्ये एकूण 81.1 दशलक्ष मेट्रिक टन वाहतूक केली, जी 2021 च्या 76.1 दशलक्ष मेट्रिक टनाच्या तुलनेत 6.55 टक्के अधिक आहे. या बंदराच्या स्थापनेपासून आजवर एका वर्षात हाताळलेली ही सर्वाधिक वाहतूक आहे. या विक्रमी कामगिरीबाबत जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी बंदरातील कर्मचारी आणि भागधारकांचे विशेष कौतुक केले आहे.

2022 हे वर्ष जेएनपीएसाठी अभूतपूर्व ठरले, कारण आम्ही या वर्षात विक्रमी मालहाताळणी करून बंदरातील आजवरची सर्वाधिक वाहतूक करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. बंदरातील सर्व टर्मिनल ऑपरेटर्सची कामगिरी विशेष कौतुकास्पद झाली. याशिवाय, 2022 मध्ये आम्ही भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर असा बहुमान प्राप्त केला आहे, असे संजय सेठी यांनी म्हटले.

यासोबतच जेएनपीए हे भारतातील पहिले 100 टक्के लँडलॉर्ड मेजर बंदर बनले आहे. उत्कृष्ट कामगिरीची व प्रयत्नांची दखल घेत जेएनपीएला सागरी आणि लॉजिस्टिक पुरस्कार 2022 मध्ये कंटेनर बंदरांच्या श्रेणीतील वर्षातील सर्वोत्कृष्ट मेजर पोर्टचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

Exit mobile version