जेएनपीएकडून विहंग कडूचा गुणगौरव

| उरण | वार्ताहर |

जेएनपीए व कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील यांच्या हस्ते जेएनपीए क्लब हाऊस येथे विहंग घन:श्याम कडू याने दहावी परीक्षेत 94.20% गुण मिळविल्याबद्दल गुणगौरव सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ट्रस्टी दिनेश पाटील यांनी सांगितले की, इतरांना वारेमाप प्रसिद्धी देणारे पत्रकार अथवा त्यांचे कुटुंब मात्र स्वतः च्या कुटूंबातील मुलांना प्रसिद्धी देऊ शकत नाही. यासाठी जेएनपीए चेअरमन यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या मुलांनी अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळविलेले आहे. त्यांचाही लवकरच गुणगौरव सोहळा करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.

नुकताच दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. त्यामध्ये उरण तालुक्यातून अनेकांना वारेमाप प्रसिद्ध देणारे पत्रकार घन:श्याम कडू यांचा मुलगा विहंग घनःश्याम कडू याने 94.20% गुण मिळविल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत होते. पत्रकाराच्या मुलाने 94 % गुण मिळविल्याबद्दल जेएनपीए ट्रस्टी व जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील यांनी गुणगौरव सोहळा व स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी जेएनपीए टाऊनशीप क्लब येथे विहंग कडू याच्या सत्काराचे आयोजन केले होते.

जेएनपीए ट्रस्टी व जेएनपीटी एकता कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील यांनी मान्यवर पत्रकारांच्या उपस्थितीत विहंग कडू याचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी दिनेश पाटील यांनी आपल्या मनोगतात विहंग कडू याच्या यशाबद्दल अभिनंदन करून कडू कुटूंबियांचेही अभिनंदन केले. तसेच यापुढे तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या मुलांचा विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा लवकरच जेएनपीए चेअरमन यांच्या हस्ते करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version