धूळप्रदूषण रोखण्यासाठी पाण्याचे फवारे; नागरिकांना दिलासा
| उरण | प्रतिनिधी |
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) परिसरात वाढत्या वायू व धूळप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने ठोस आणि पर्यावरणपूरक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बंदर परिसरात सातत्याने सुरू असलेल्या मालवाहतूक, कंटेनर हाताळणी तसेच अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे निर्माण होणाऱ्या धूळप्रदूषणावर मात करण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांची व्यापक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
जेएनपीएच्या अंतर्गत रस्ते, कंटेनर यार्ड, गोदाम परिसर, मालवाहतुकीचे मार्ग तसेच संवेदनशील भागांमध्ये नियमित अंतराने पाण्याचे फवारे मारले जात आहेत. त्यामुळे हवेत उडणारी धूळ जमिनीवर बसून वायू प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः उन्हाळ्यात व कोरड्या हवामानात धूळप्रदूषण अधिक तीव्र होत असल्याने हा उपक्रम अधिक प्रभावी ठरत आहे. तसेच, जेएनपीए प्रशासनाने पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य देत केवळ पाण्याचे फवारेच नव्हे, तर हरित पट्टा वाढविणे, वृक्षलागवड, रस्त्यांची नियमित स्वच्छता, यांत्रिक स्वीपिंग मशिन्सचा वापर तसेच प्रदूषण नियंत्रण मानकांचे काटेकोर पालन करण्यावरही भर दिला आहे. बंदर परिसरातील विविध टर्मिनल ऑपरेटर आणि कंत्राटदारांनाही प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना राबविण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमामुळे जेएनपीए परिसरात काम करणारे कर्मचारी, वाहनचालक तसेच आसपासच्या उरण तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. पूर्वी धूळप्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ तसेच आरोग्यविषयक तक्रारी वाढत होत्या. मात्र, पाण्याच्या फवाऱ्यांच्या नियमित वापरामुळे वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याचे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पर्यावरण संतुलन राखत बंदर विकास साधण्याचा जेएनपीएचा संकल्प असून, भविष्यातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रदूषण नियंत्रणासाठी आणखी प्रभावी उपाय राबविले जाणार असल्याचे जेएनपीए प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विकासासोबत पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधण्याचा आदर्श जेएनपीए परिसरात निर्माण होत असल्याचे चित्र आहे.







