नागरिक व वाहनचालकांना दिलासा
| उरण । वार्ताहर ।
जेएनपीटी बंदराला जोडणार्या उड्डाणपुलाची खड्ड्यामुळे दुरावस्था झाली होती. या पुलाची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जेएनपीटीला जोडणारा खड्डेयुक्त उड्डाणपुल खड्डेमुक्त झाला आहे. या पुलाच्या दुरुस्तीमुळे प्रवासी नागरिक व वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
जेएनपीटी बंदराला जोडणार्या न्हावा शेवा पोलीस ठाण्या शेजारील उड्डाणपूल महत्वाचा आहे. या उड्डाणपुलावरून दररोज चौथ्या बंदरात ये-जा करणार्या शेकडो जड कंटेनर वाहनांचा राबता असतो. त्याचप्रमाणे जेएनपीटी बंदर व बंदरावर आधारित उद्योगात काम करणारे कामगार व कर्मचारी आपल्या वाहनाने ही याच मार्गाने प्रवास करीत आहेत. तसेच याच मार्गाने जेएनपीटी ते मुंबई प्रवास करणारी प्रवासी वाहने ही ये-जा करीत आहेत. या नादुरुस्त उड्डाणपुलामुळे आशा अनेक वाहने व त्यातून प्रवास करणार्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत होता. जेएनपीटीच्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूसह संपूर्ण मार्गावर खड्डे पडले होते. या खड्डयाचे मुख्य कारण हे पुलावरील डांबरीचा थर उखडून खड्डे झाले होते. या खड्ड्यामुळे पुलावरून रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले होते. खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे या नादुरुस्त उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी व वाहनचालका कडून केली होती. त्यानंतर या उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्यात आल्याने समाधान व्यक्त केला जात आहे.