जेएनपीटीच्या अधिकार्‍यामुळे कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात

रहिवासी इमारती धोकादायक; रहिवाशांच्या नशिबी नरकयातना
। जेएनपीटी । वार्ताहर ।
जेएनपीटी बंदराच्या वसाहतीमधील मेंटेनन्सचे अधिकारी हे रहिवाशांच्या तक्रारीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणार्‍या अनेक समस्यांचा सामना नाहक येथील रहिवाशांना करावा लागत आहे. तरी जेएनपीटी बंदराचे चेअरमन संजय सेठी यांनी वसाहतीमधील मेंटेनन्सचे अधिकारी यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

जेएनपीटी बंदरातील कामगारांच्या कुटुंबियांना राहण्यासाठी उत्तम दर्जाची, सुसज्ज, सुविधांयुक्त वसाहत असावी यासाठी जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने नवघर आणि जसखार ग्रामपंचायत हद्दीत सेक्टर 1,2 आणि 3 या अनुषंगाने चार मजली इमारतीची उभारणी 25 वर्षांपूर्वी केली. तसेच या इमारतीच्या दुरुस्तीचे काम जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी सुमारे 165 कोटी रुपये खर्चून हाती घेतले. परंतु, बंदरातील अधिकारी यांच्या डोळेझाक कारभारामुळे ठेकेदारांनी इमारतीच्या दुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणात हेराफेरी करून निकृष्ट दर्जाचे काम केले. त्यामुळे दुरुस्ती करण्यात आलेल्या इमारतींना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती लागून इमारतीची पडझड सुरू झाली आहे.

त्यातच पावसाळ्यात झाडे, झुडपे आणि गवत वाढल्याने सरपटणार्‍या प्राण्यांचा वावर इमारती परिसरात होऊ लागला असून, रहिवाशांबरोबर परिसरात बागडणार्‍या मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती रहिवासी व्यक्त करत आहेत. तरी वसाहतीमधील रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बंदराचे चेअरमन संजय सेठी यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

आरोग्याचा प्रश्‍न गंभीर
जेएनपीटी वसाहतीमधील मेंटेनन्सचे अधिकारी हे रहिवाशांच्या तक्रारीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने इमारती परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घाणीबरोबर मळमिश्र दुर्गंधीयुक्त पाणी इमारती परिसरात पसरत असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

Exit mobile version