जेएनपीटीची वाहतूक पनवेल शहराबाहेरून

| पनवेल । वार्ताहर ।

जेएनपीटीची वाहतूक पनवेल शहराबाहेरून जाण्यासाठी चिरनेर ते चौकदरम्यान प्रशस्त असा ग्रीन फिल्ड महामार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची लवकरच निविदा निघणार असून त्यानंतर काम हाती घेण्यात येणार आहे.

जगातील अग्रभागी असलेल्या जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात मालाची आयात-निर्यात केली जाते. लाखो कंटेनरची हाताळणी करणार्‍या जेएनपीटी बंदरात जास्त संख्येने वाहने ये-जा करतात. दक्षिणेकडे जाणार्‍या-येणार्‍या वाहनांना पनवेलकडे यावे लागते. त्याचबरोबर द्रुतगती महामार्गावर जाण्यासाठीही पनवेल गाठावे लागते. दक्षिण आणि उत्तरेकडे मालवाहतूक करणार्‍या वाहनांमुळे पनवेल परिसरात वर्दळ निर्माण होते. यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या पार्श्‍वभूमीवर जेएनपीटीत येण्या-जाण्याकरिता स्वतंत्र महामार्गाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाची घोषणा केली असून लवकरच त्यानुसार प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

साडेतीन हजार कोटींचा खर्च
जेएनपीटीहून तीन महामार्गांना जोडणार्‍या या रस्त्याला साडेतीन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये जेएनपीटी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सहभागी होणार आहे.

Exit mobile version