लालपरी देणार बेरोजगारांना रोजगार

एसटी महामंडळात मिळणार नोकरी

| रायगड | प्रतिनिधी |

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात आठ हजार नवीन बसगाड्या दाखल होणार आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. यासाठी कंत्राटी पद्धतीने 17 हजार 450 चालक व सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून येत्या 2 ऑक्टोबर रोजी निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यांना किमान 30 हजार रुपये वेतन मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 300 व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, बस सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक तीन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबविण्यात येत आहे. ही ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागांमध्ये राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला सुमारे 30 हजार रुपये वेतन देण्यात येईल. याबरोबरच उमेदवारांना एसटीतर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बसची वाढती संख्या आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंड, सुरक्षित व दर्जेदार बस सेवा उपलब्ध करणे शक्य होणार आहे.

Exit mobile version