जोकोविचने काढला पराभवाचा वचपा

पटकावले पहिले सुवर्णपदक

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत टेनिसमध्ये पुरुष एकेरीचा अंतिम सामना नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्काराज यांच्यात झाला. अव्वल दोन मानांकित खेळाडूंमध्ये झालेल्या या सामन्यात 37 वर्षीय नोवाक जोकोविचने 7-6, 7-6 असा विजय मिळवला. या विजयासह त्याने सार्बियाच्या खात्यात सुवर्णपदकाची भर टाकली. त्याचे हे ऑलिम्पिकमधील पहिलेच सुवर्णपदक आहे. त्याच्या विजयामुळे स्पेनच्या अल्काराजला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

तब्बल 2 तास 50 मिनिटे चाललेल्या या सामन्यात युवा अल्काराजने शेवटपर्यंत मोठी झुंज दिली. पहिला सेट तब्बल 94 मिनिटांचा झाला. दोघांनीही आपापल्या सर्व्हिसवर विजय मिळवला. त्यामुळे या सेटमध्ये 6-6 अशा बरोबरीनंतर टायब्रेकमध्ये या गेमचा निकाल लागला. यामध्ये जोकोविचने 7-3 असा विजय साकारला व 1-0 अशी आघाडी घेतली.दुसर्‍या सेटमध्येही दोन्ही टेनिसपटूंमध्ये रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. दोघांमध्ये 6-6 अशी बरोबरी झाल्यानंतर पुन्हा टाय ब्रेक झाला. यामध्ये जोकोविचने 7-2 अशी सहज मात केली आणि सुवर्णपदकावर हक्क सांगितला.

Exit mobile version