रसायनी | वार्ताहर |
रौप्य महोत्सव साजरा करीत असलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे सांगितिक क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकारास स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाच्या वर्षी भजनसम्राट पद्मश्री अनुप जलोटा आणि प्रसिद्ध पार्श्वगायक श्रीवल्लीफेम जावेद अली यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून, प्रत्येकी एक लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदाचे 14 वे वर्ष आहे.
तसेच दरवर्षी देण्यात येणारा आदर्श कार्यकर्ता हा पुरस्कार नागपूर येथील विरेंद्र लाटणकर व रायगड जिल्ह्यातील रसायनी येथील राकेश खराडे यांना जाहीर झाला आहे. विरेंद्र लाटणकर व राकेश खराडे हे गेली अनेक वर्षे शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानची निष्काम सेवा करीत आहेत. हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते 2 डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे देण्यात येणार आहे.