पत्रकार शशिकांत वारीसे हत्येचा जिल्ह्यातील पत्रकारांकडून निषेध

जिल्हा प्रशासनाला निवेदन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
विरोधात बातमी छापली या रागातून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीसे त्यांच्या दुचाकीला ठोकर मारीत जाणीवपूर्वक हत्या करण्यात आली. पत्रकार शशिकांत वारीसे यांची हत्या तसेच राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ल्यांचा शुक्रवारी काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, रायगड जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, सरचिटणीस संजय खांबेटे, प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अभय आपटे, जिल्हा संघटिका मानसी चेऊलकर यांच्यासह अलिबाग येथील पत्रकारांनी काळ्या फिती लावून अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांना निवेदन दिले.

महानगरी टाइम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवले येथून दुचाकीने जात होते. यावेळी भरगाव वेगाने महेंद्रा थार गाडीने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. याच भीषण अपघातात वारीसे यांचा मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून घातपात आहे. शशिकांत वारीसे यांनी ज्याच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली, ते कारचालक पंढरीनाथ आंबेडकर होते. सकाळी आंबेरकर याच्याविरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीच्या कार धडकेत पत्रकार वारीसे यांचा मृत्यू होतो, योगायोग नसून कट रचून केलेला खूनच आहे. याचा राज्यातील सर्व पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध केला. आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा. या घटनेची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यातील पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटनांसह पेण तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे.

उग्र आंदोलन
राज्यातील पत्रकारांचा विविध मार्गाने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही. पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा पेण तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने भारत रांजणकर, नागेश कुलकर्णी यांनी दिला. यावेळी कशाळकर, राजन वेलकर, अ‍ॅड. रत्नाकर पाटील, महेश पोरे, सुयोग आंग्रे, महेंद्र खैरे, सुहास तारे, रमेश कांबळे, सचिन पावशे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version