माणगाव पोलिसांना पत्रकारांची अ‍ॅलर्जी

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेच निमंत्रण नाही
माहिती देण्यास डावलल्याने नाराजीचा सूर

माणगाव । वार्ताहर ।
रायगड जिल्हा पोलीस दलाच्या माणगाव पोलीस ठाणे यांच्यावतीने पोलीस स्मृतिदिनानिमित्त माणगावात ढालघर फाटा याठिकाणी पुरुष व महिला गटासाठी अनुक्रमे 10 व 3 कि.मी. अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धा शनिवार, दि.23 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे साधे निमंत्रण स्थानिक पत्रकारांना दिले नसल्याने तालुक्यातील पत्रकारांमध्ये नाराजी पसरली असून, माणगाव पोलिसांना पत्रकारांची अ‍ॅलर्जी असल्याचे दिसून येत आहे.
माणगाव पोलीस हे अलीकडच्या काळात पत्रकाराची हेळसांड करीत आहेत.एखाद्या दाखल गुन्ह्याची किंवा घटनांची माहिती घेण्यास पत्रकार गेले असता त्यांना उगाचच ताटकळत ठेवले जाते. दाखल नाही, नेट नाही, ठाणे अंमलदार नाही, असे सांगत पत्रकारांना त्रास दिला जात आहे. केवळ माणगाव पोलीस त्यांच्या मर्जीतील त्यांना हवी असणारी बातमी प्रसिद्ध होण्यासाठी मग मात्र पत्रकारांच्या पाठीशी लागतात. अनोळखी इसम, मनुष्य मीसिंग किंवा त्यांनी एखाद्या घटनेचा छडा लावला असल्यास अशा बातम्या देण्यासाठी प्रसंगी काही अनुभवी पत्रकारांच्या थेट घरी जाऊन त्यांना डीआर व फोटो दिले जातात. मात्र, पत्रकारांना हवी असणारी माहिती देताना त्यावेळी त्यांना तासन्तास बसून ठेवण्यात माणगाव पोलीस धन्यता मानतात. पोलीसवाले पत्रकारांसकट सर्वच लोकप्रतिनिधींना डावलत असल्याने पोलिसांच्या या वर्तणुकीमुळे तालुक्यात सर्वत्र पोलिसांबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.

Exit mobile version