। पाली/बेणसे । वार्ताहर ।
आंबेडकरी बहुजन चळवळीतील लढाऊ, विचारवंत व ज्येष्ठ नेते, पत्रकार मंगेश वाघमारे यांचा पाली-खोपोली मार्गावर तुकसई गावाजवळ मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. अपघातात झालेला त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्यामुळे त्याचा सखोल तपास व चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी सुधागड व खालापूर तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत पत्रकारांनी खालापूर उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांची भेट घेतली व या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनानूसार मंगेश वाघमारे यांच्या अपघाताचे कोणतेही धागेदोरे किंवा पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. केवळ त्यांची मोटरसायकल व मृत शरीर घटनास्थळी मिळाले. अपघात केलेले वाहन किंवा त्या वाहनाचे कोणतेही भाग घटनास्थळी नव्हते. त्यामुळे या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. तसेच हा अपघात नसून घातपात आहे, असे देखील बोलले जात आहे. परिणामी अशा संशयास्पद मृत्यूची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी पत्रकारांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांनी अपघाताचा तपास योग्यरित्या केला जाईल, अशी ग्वाही उपस्थित पत्रकारांना दिली.