| कर्जत | वार्ताहर |
यंदा उन्हाळ्यात कर्जत तालुक्यातील तापमानाने 45 अंश गाठले होते. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी तालुक्यात एक हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प पत्रकारांनी केला आहे. यासाठी त्यांना वनविभाग मदत करणार आहे.
कर्जत हा निसर्गसंपन्न तालुका आहे. डोंगर दुर्गम भाग हा तालुक्याचा अविभाज्य भाग आहे. येथे हरित पट्टा असल्याने औदयोगिक क्षेत्राला थारा देण्यात आलेला नाही. तर याच तालुक्यात माथेरानसारखे जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. पर्यटनाचा तालुका अशी कर्जत तालुक्याची ओळख आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात फार्महाऊस आणि रिसॉर्ट आहेत. मात्र जगभरातील वृक्षतोडीची समस्या कर्जत तालुक्यातदेखील आहे. याचा परिणाम मागील काही वर्षांपासून ऋतूंवर होऊ लागला आहे. वृक्षारोपणासाठी वन विभागाने मदतीचा हात दिला आहे. वृक्षारोपण केल्यानंतर त्या वृक्षांची जबाबदारी संबंधित पत्रकाराची असेल. तालुक्यातील एका मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केले जाणार आहे. रणरणत्या उन्हात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांमुळे वाहनचालकांना मिळणारा दिलासा महत्त्वाचा असतो. तेव्हा वृक्ष किती महत्त्वाचे आहेत याचे फलकदेखील संबंधित ठिकाणी लावण्यात येणार आहेत, अशी माहिती कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी दिली आहे.