| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील जमिनीवर उभारलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्यावतीने धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. हे आंदोलन स्थगित करावे यासाठी बेलापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार व सिडकोचे दक्षता मुख्य अधिकारी सुरेश मेंगडे यांनी सिडकोचे विमानतळ प्राधिकरण सहव्यवस्थापक शंतनू गोयल यांच्याशी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घडवून आणत बैठकीचे आयोजन केले. यावेळी झालेल्या बैठकीत सिडकोचे विमानतळ प्राधिकरण सहव्यवस्थापक शंतनू गोयल यांनी सिडको प्रशासन हे स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आग्रही आहे. कारण आजपर्यंत विमानतळ नामकरणाचे जे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, ते फक्त दिबांच्या नावाचेच असल्यामुळे आणि स्थानिकांसह पत्रकार आंदोलनाच्या पावित्र्यात उतरल्यामुळे सिडको प्रशासन तथा विमानतळ प्राधिकरण देखील दिबांच्या नावासाठी प्रयत्नशील असल्याचे आयोजित बैठकीत आश्वासित केले आले.







