समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य पत्रकार करतात- तहसीलदार विजय तळेकर

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
दर्पण आणि दिग्दर्शन या दुहेरी मार्गाचा योग्य संतुलन करत समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य पत्रकार करतात. समाजाला दर्पण दाखवून दिशा निर्देशन देण्याचे महत्वाचे कार्य पत्रकार करतात. पत्रकार आपल्या कार्यामधून समाजाला वेळप्रसंगी प्रशासनाला दिशानिर्देश देतात. नोकरीच्या कारकिर्दीमध्ये पनवेलसारखे विधायक आणि समंजस सर्वसामावेशी वातावरण इतर कुठे पाहता आले नाही, असे मत पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी व्यक्त केले. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्यावतीने शहरातील सिंधी पंचायत हॉल सभागृहात पत्रकार दिन समारोह आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच जे.एम. म्हात्रे ट्रस्टचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे माजी अध्यक्ष कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर, व्यवसायिक राजू कोळकर, शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, मनसे पनवेल शहर प्रमुख संजय मुरकुटे, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे उपस्थित होते.

यावेळी पत्रकार दीपक महाडिक आणि गणेश कोळी यांना जीवनगौरव पुरस्कार, सुधीर पाटील यांना पर्यावरण जागृती कार्यासाठी, निर्भय युवा पत्रकार म्हणून पत्रकार अनिल भोळे, संजय कदम, मयूर तांबडे, सागर राजे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. अमित दवे तसेच समाजसेवक म्हणून संतोष ठाकूर आणि प्रकाश गायकवाड यांचा मानपत्र तसेच तुळशी रोप देऊन सत्कार करण्यात आला.
विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पत्रकारिता आणि समाज यावर सविस्तर भाष्य केले. पोलीस आणि पत्रकार हे दोन्ही घटक स्वतःची पर्वा न करता जीवतोड मेहनत करत कार्यरत असतात. आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने देखील पत्रकार संघर्ष समितीने पत्रकारांसह वैद्यकीय, पर्यावरण, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील लोकांचा सन्मान करून आपले निरपेक्ष कार्य दाखवून दिल्याचे ते म्हणाले.

पत्रकारांनी कोरोना काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बातम्या आणि जनजागृतीसह सामान्यजनांना धान्यवाटप, वैद्यकीय मदत अशी विधायक कामे केल्याचे रामदास शेवाळे म्हणाले
पत्रकार संघर्ष समितीचे सरचिटणीस विशाल सावंत, कार्याध्यक्ष केवल महाडिक, गणपत वारगडा, सहचिटणीस रवींद्र गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख संतोष सुतार, सुनील कटेकर, सनीप कलोते, दीपाली पारसकर, लक्ष्मीकांत ठाकूर, भरतकुमार कांबळे, अ‍ॅड. मनोहर सचदेव, आनंद पवार आदी पत्रकारांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. डॉ. धनश्री सरदेशपांडे आणि पत्रकार प्रवीण मोहोकर यांनी सूत्रसंचालन तर प्रास्ताविक पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी केले.

Exit mobile version