| अलिबाग | प्रतिनिधी |
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित रायगड (दक्षिण विभाग) युवा महोत्सवात अलिबागमधील जेएसएम महाविद्यालयाने अभूतपूर्व यश संपादन करत रायगड झोन चॅम्पियनशिप पटकावली आहे. या महोत्सवात महाविद्यालयातील 33 विद्यार्थ्यांनी 25 स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन तब्बल 15 स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविली आहेत. युवा महोत्सवाची जिल्हास्तरीय फेरी अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरुड-जंजिरा येथे सोमवारी (दि.18) आयोजित करण्यात आली होती.
या महोत्सवात कोलाज, चित्रकला, पोस्टर मेकिंग, वकृत्व (मराठी), कथाकथन (हिंदी), वादविवाद (मराठी), एकांकिका (मराठी), एकपात्री अभिनय (हिंदी) यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा झेंडा उंचावला आहे. कथाकथन (मराठी) तालवाद्यवादन, मूकाभिनय, भारतीय समूहगीत गायन मध्ये द्वितीय तर नाट्यसंगीतमध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच, वादविवाद (हिंदी/इंग्लिश), लोकनृत्यमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. श्रेया अधिकारी हिने एकूण पाच स्पर्धांमध्ये सहभाग घेत पाच पारितोषिके मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रवीण गायकवाड, जिल्हा समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. श्वेता पाटील यांनी सर्व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत विद्यापिठस्तरिय अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
युवा महोत्सवात जेएसएमचा दबदबा
