कंपनी प्रशासनाचा मनमानी कारभार; जिल्हा प्रशासनाचेही होतेय दुर्लक्ष
। पेण । विशेष प्रतिनिधी ।
पेण-अलिबाग रस्त्याची दुरवस्था, अवजड वाहनांमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी अशा एक ना अनेक कारणांमुळे वडखळ येथील जेएसडब्ल्यू कंपनी चर्चेत असते. यामध्ये सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रदुषण. याबाबत अनेक तक्रारी करुनही, ग्रामस्थांचा विरोध झुगारुन डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या मनमानी कारभाराला महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळही सहकार्य करीत असल्यामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वडखळ येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रदुषणाचा फटका पेण व अलिबाग तालुक्याला सर्वाधिक प्रमाणात बसतो. पेण-अलिबाग मार्गावरुन प्रवास करताना त्याचा प्रत्यय प्रत्येकालाच येतो. कंपनीतील धूरामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार जडले आहे. मात्र तरीही कंपनीतून प्रदुषण होत नसल्याचा दावा कंपनी प्रशासनासह प्रदुषण मंडळाकडूनही केला जात आहे, ही दुदैवी बाब आहे. या कंपनीतील प्रदूषणाविरोधात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी संबधित यंत्रणा मात्र सोयीस्कररित्या काणाडोळा करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीकडून हरित पट्टा नियम धाब्यावर बसवण्यात आल्याने नागरिकांना कंपन्यांमधून निघणार्या धूर आणि वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे प्रदूषण मंडळाचे अधिकारी कारवाई करताना नियमाला बगल देत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
श्वसनाच्या रुग्णांत वाढ
पेण व अलिबाग शहरातील अनेक दवाखान्यांमध्ये श्वसनाच्या आजारांच्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे कर्करोगाचे प्रमाणदेखील वाढल्याचे चित्र दिसत आहे. असे असले तरी प्रदूषण मंडळाकडून कंपनीला प्रदूषण होत नसल्याचा दाखला दिला जात आहे, ही आश्चर्यकारक बाब आहे.
त्रास स्थानिकांना, रोजगार परप्रांतियांना
औद्योगिकीकरण म्हटल्यावर प्रदूषणासह रोजगारही येतो. मात्र अलिबाग आणि पेणकरांच्या नशिबी उपेक्षाच असल्याचे दिसून येते. कारखाना पेणमध्ये असून स्थानिकांना रोजगाराच्या संधीतून कंपनीने अनेकदा डावलले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे प्रदूषण पेण व अलिबाग तालुक्याने सहन करायचे, मात्र रोजगार परप्रांतियांना द्यायचा, हे कंपनी प्रशासनाचे तत्त्व पेण व अलिबाग तालुक्याने का मान्य करावे, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कंपनीचा खोटा दावा
जेएसडब्ल्यूने मोठ्या प्रमाणात खर्च करून खारेपाटात मॅग्रोजची लागवड केली असल्याचा दावा कंपनीच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आला. परंतु, खरंच लागवड झाली असती तर, मॅग्रोजची वाढ झालेली आपल्याला पहायला मिळाली असती. खारेपाट हद्दीमध्ये कृषीवलच्या प्रतिनिधींनी जाऊन कोणत्या भागामध्ये मॅग्रोज लावले आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, मॅग्रोजची लागवड कोठेच झाल्याचे आढळून आले नाही.
हरित लवादाची टांगती तलवार
अनेकदा तक्रारी करुनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम पायदळी तुडवत कंपनी प्रशासन रासायनिक वायू सोडत आहे. यावरुन प्रदुषण मंडळ केवळ नोटिसा बजावण्यापुरतेच सक्रिय असल्याचे दिसते. कंपनीतून सोडल्या जाणार्या प्रदुषित वायुमुळे अलिबाग तसेच पेण तालुक्यातील प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. कंपनीवर राष्ट्रीय हरित लवादाची कारवाईची टांगती तलवार असतानाही कंपनी प्रशासनाला भय नाही. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
स्क्रबर सिस्टीमचा वापर होतोय का?
या कंपनीतून लोखंडावर प्रक्रिया करताना निघणारी रसायने व धुलीकण असलेला वायू संपूर्ण आकाश व्यापून टाकतो. कारखान्यातून निघणार्या धुरामुळे वायू प्रदूषण होऊ नये यासाठी स्क्रबर सिस्टीमचा वापर गरजेचा असतो. परंतु ही प्रक्रिया खर्चिक असल्याने कारखान्यांकडून तिचा वापर केला जात नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.






