वाशीच्या शिवकालीन तलावाला जेएसडब्ल्यूचा आधार

। पेण । प्रतिनिधी ।

पेण वाशी येथे जगदंबा मंदिरासमोर शिवकालीन विस्तीर्ण जलाशय आहे. या तलावांचा गाळ काढणे व संरक्षण भिंत बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे काम जेएसडब्ल्यू सीएसआर फंडातून केले जात आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंच संदेश ठाकूर उपसरपंच सुरेखा अनंत पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.

सुमारे 13 एकर क्षेत्रावर वाशी ओढांगी या दोन गावांना जोडणारा हा शिवकालीन तलाव सुमारे पाच हजार लोकवस्तीसाठी टंचाई कालखंडात पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडीत होता. गेली पंचवीस वर्षे या तलावात गाळ साचून पाणी पातळी कमी झाली होती. या समस्येकडे लक्ष केंद्रित करुन वाशी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश ठाकूर आणि ग्रामपंचायत सदस्यांनी या तलावाचा गाळ उपसा काढण्यास प्रारंभ केला आहे.

यासाठी जेएसडब्लू सीएसआर विभागाचे प्रमुख सुधीर तेलंगे आणि टीमचे बहूमुल्य सहकार्य लाभले असून वॉटर संस्थेचे प्रमुख सुशांत वांवढळ आणि प्रशांत पाटील यांच्या सहकार्याने ग्रामसहभाग जल संवर्धन आणि व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत या तलावाचे गाळ काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जिथे कमी तिथे आम्ही अशी जेएसडब्लू सीएसआर विभागाची भूमिका आहे. जलसंवर्धन मोहिमेत त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. वाशी शिवकालीन तलावाची पाहणी करुन निधी उपलब्ध करून देण्यासाठी सीएसआर फंडाचे प्रमुख सुधीर तेलंगे यांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे वाशी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व जनतेने त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Exit mobile version