| अलिबाग | प्रतिनिधी |
फरार असलेल्या महेंद्रनामक आरोपीला महालुंगे आदिवासीवाडी येथील त्याच्या राहत्या घरातून रेवदंडा पोलिसांनी बंदुकीसह पकडले होते. एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर शनिवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती रेवदंडा पोलिसांनी दिली.
तरुणीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने बंदुकीने हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी महेंद्र 2015 पासून फरार होता. न्यायालयाने त्याला अटक वॉरंट काढला होता. त्यानुसार रेवदंडा पोलिसांनी खबऱ्यांमार्फत शोध घेऊन गुरुवारी (दि.1) फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास महालुंगे येथील आदिवासीवाडीमधील त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक बंदूक सापडली. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तीन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या पोलीस कोठडीनंतर शनिवारी (दि.3) रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार नंदगावे करीत आहेत.






