। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचे नाव क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. त्याने खेळाडू म्हणून कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. आणि आता ज्युनियर द्रविडला क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहे. सध्या त्याच्या एका षटकारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
द्रविडचा मुलगा समित हा देखील क्रिकेटपटू असून आता तो वरिष्ठ स्तरावरही खेळताना दिसत आहे. यापूर्वी समित वयोगटातील क्रिकेट खेळला आहे. वयोगटातील क्रिकेट खेळताना अनेकदा त्याने त्याची प्रतिभा दाखवली आहे. आता कर्नाटक प्रीमियर लीगऐवजी सुरू झालेल्या महाराजा ट्रॉफी स्पर्धेत तो खेळताना दिसत आहे. त्याने नुकतेच महाराजा ट्रॉफी या स्पर्धेत पदार्पण केले आहे.
समित या स्पर्धेत म्हैसूर वॉरियर्स संघाकडून खेळत आहे. दरम्यान, त्याला पहिल्या दोन सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र, त्याच्या एका शॉटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. समितने शुक्रवारी (दि.16) बंगळुरू ब्लास्टर्स संघाविरुद्ध सामना खेळला. या सामन्यात म्हैसुर संघाने प्रथम फलंदाजी केली होती. यावेळी समित चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्याने ग्नेश्वर नवीनने गोलंदाजी केलेल्या सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर समितने एक मोठा शॉट खेळला. त्याच्या या शॉटवर चेंडू थेट स्टँडमध्ये जाऊन पडला. त्याच्या या षटकाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, या शॉटनंतर तो लगेचच पुढच्या चेंडूवर 7 धावांवर बाद झाला.